महाराष्ट्रमुंबई

Mumbai: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत, मुंबई विभागातील 800 ज्येष्ठ नागरिक

4 ऑक्टोबर रोजी अयोध्येला जाणार

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक 4 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येसाठी विशेष रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून रवाना होणार असल्याची माहिती मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण) वंदना कोचुरे यांनी दिली.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरीक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना तिर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतातील एकूण 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळांचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्ह्यातून 150, मुंबई उपनगर या जिल्हयातून 306 व ठाणे जिल्ह्यातून 471 अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यातून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी जाणार आहेत.

यासाठी विशेष रेल्वे 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रवाना होईल व 8 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येतून मुंबईला परत येईल. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दिक्षाभूमी नागपूर, अजमेर, महाबोधी मंदीर गया, शेगाव, पंढरपूर या तीर्थ क्षेत्रासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून 2505 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासंबंधी नियोजन सुरू आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button