महाराष्ट्रमुंबई

Mumbai: कर्जत जामखेडमध्ये यावेळी भाजपा परिवर्तन घडविणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

शरद पवार गटाचे मधुकर राळेभात, उबाठा चे संजय काशीद यांचा भाजपा प्रवेश

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि कर्जत जामखेड जागेवर परिवर्तन होऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख आणि नगर जिल्हा परिषद माजी सदस्य मधुकर राळेभात, उबाठा शिवसेनेचे जामखेड तालुका अध्यक्ष संजय काशीद यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये श्री. फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आणि आमदार राम शिंदे,आ. सुरेश धस, आ. अतुल भातखळकर आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष श्री.बावनकुळे यांनी श्री.राळेभात, श्री. काशीद आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.


श्री. राळेभात यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्जत,जामखेड मध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस रुजवली असे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढणार आहे. भाजपाच्या परिवारात आपण एकजुटीने काम करू अशी ग्वाहीही त्यांनी नव्याने प्रवेश करणा-या सर्वांना दिली. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न महायुती सरकारने केल्याचे नमूद करत श्री. फडणवीस म्हणाले की पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे 55 टीएमसी पाणी गोदावरी खो-यात आणण्यासाठी कॅबिनेटने मान्यता दिली आहे. याच्या कामाचे पहिले टेंडरही निघाले असून संपूर्ण जिल्हा जलमय करण्यासाठी महायुती सरकार वेगाने काम करत आहे. महायुती सरकारने शेतकरी हितार्थ घेतलेल्या निर्णयांचा ही त्यांनी उल्लेख केला.


यावेळी श्री. राळेभात म्हणाले की, मागच्या निवडणुकीत रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले.कुकडीच्या पाण्यासह अनेक समस्या सोडवण्याची त्यावेळी केवळ आश्वासने दिली गेली मात्र पाच वर्षांत काहीच काम केले नाही. जाती जातीत दरी निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात आले . त्यामुळे व्यथित होऊन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कर्जत जामखेडच्या विकासासाठी भाजपा मध्ये येण्याचा निर्णय घेतला असेही श्री. राळेभात यांनी सांगितले. भाजपा नेतृत्व जे काम सांगेल ते करू, पक्षातर्फे जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीशी उभे राहू असेही त्यांनी स्पष्ट केले.श्री. राळेभात यांच्या सोबत कर्जत – जामखेड तालुक्यातील अनेक सरपंच, नगरसेवक, पदाधिका-यांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button