Mumbai: मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन संकुलाच्या
कोनशिलेचे सरन्यायाधीशांच्या हस्ते सोमवारी अनावरण
मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल हे वांद्रे पूर्व, मुंबई येथे बांधण्यात येणार असून सोमवार, 23 सप्टेंबर 2024 रोजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे.
कोनशिला अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई, न्यायमूर्ती ए.एस.ओक, न्यायमुर्ती दीपंकर दत्ता, न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय उपस्थित राहणार आहेत.
सध्या मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे 16 ऑगस्ट 1862 रोजी स्थापन झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे. नोव्हेंबर 1878 मध्ये बांधण्यात आलेली ही भव्य इमारत केवळ 6 न्यायालये आणि दहा न्यायाधीशांच्या वापरासाठी तयार करण्यात आली होती.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून औद्योगिक आणि आर्थिक विकासात आघाडीवर आहे. काळानुरूप मुंबई उच्च न्यायालयाच्या पायाभूत सुविधांनी युक्त अशा इमारतीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
या नवीन प्रस्तावित संकुलात न्यायालयीन खोल्या, न्यायाधीश आणि नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी दालन, वकीलांसाठी कक्ष, सभागृह, ग्रंथालय याबरोबरच बँकिंग सुविधा, वैद्यकीय सुविधा, कॅफेटेरिया, वाहनतळ, संग्रहालय अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध असतील. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या इमारतीत असतील.