Mumbai: भाजपच मुख्यमंत्री शिंदे व अजित दादा पवार यांचे उमेदवार पाडणार:-महेश तपासे
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नड्डा नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली.
भाजपच्या या बैठकीवर महेश तपासे, मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
तपासे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिक आमदार निवडून येऊ नये अशी मनशा भारतीय जनता पार्टीची आहे व त्यासाठी ते रणनीती तयार करत आहे.
छातीवर मोठा दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री पद बहाल केले हे एका भाजप नेत्याच्या वक्तव्याची आठवण महेश तपासे यांनी करून दिली.
लोकसभेतील निवडणुकीच्या अपयशाचे खापर भाजप व आरएसएस ने या अगोदरच अजितदादा यांच्यावर फोडले आहे व त्यामुळे अजितदादा यांच्या पक्षाला भाजप किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया तपासे यांनी दिली.
भाजपकडे मुख्यमंत्री पदाकरिता चेहरा नाही आणि त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं श्रेय शिंदे व पवार यांनी लाटले व भाजपला काहीच फायदा होत नसल्याचे चित्र समोर आल्यामुळे भाजप नेते नाराज आहेत.
दुसरीकडे, शिंदे व अजित पवार यांची मतं भाजपला ट्रान्सफर होत नाहीत हे भाजप ओळखून असल्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे व अजित दादा यांच्यावरील भाजपचे प्रेम पुतना मावशीचं असून याची प्रचिती या दोघांना निवडणूक काळात येईल,” असा टोला महेश तपासे यांनी लगावला.