Mumbai: इव्हेंट आणि जाहिरातींसाठी ४००-४०० कोटी रुपये खर्च करता, शेतकऱ्यांनाही मदत मिळावी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी
मराठवाडा आणि विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत की, सप्टेंबरच्या सुरुवातीच्या चार दिवसांतच राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील तब्बल दहा जिल्ह्यांतील सुमारे ८.५ लाख हेक्टर वरील पिके वाहून गेली आहेत. ६०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. नांदेड सर्वाधिक ३ लाख ३९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी काल या भागात जावून पाहणी केली खरी पण ही पाहणी केवळ ‘इव्हेंट’ नसावा अशी आमची माफक अपेक्षा आहे. इव्हेंट आणि जाहिरातींसाठी हे सरकार ४००-४०० कोटी रुपये खर्च करत आहे. अशा परिस्थितीत सध्या रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी आमची मागणी आहे.