Mumbai: भाजपा युती सरकारचे कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष आणि पैसा वसुलीवर मात्र लक्ष: रमेश चेन्नीथला.
पुण्यातील कॅन्सर हॉस्पिटलची ५०० कोटींची जमीन ७० कोटीत विकली, पोलीस बदल्यांमध्येही भ्रष्टाचार: नाना पटोले मविआ सरकार असताना एस. टी. संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का ?: विजय वडेट्टीवार. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक पुण्यात संपन्न.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून हत्या, खून, दरोडो, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा युती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व लक्ष मात्र घोटाळे करून पैसा वसुल करण्याकडे आहे, असा घणाघाती हल्लाबोल प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहर व ग्रामीण, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पुण्यात झाली या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, CWC सदस्य, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, गोवा दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, माजी मंत्री रमेश बागवे, मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा, पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. संजय जगताप, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष कैलाश कदम, आ. संग्राम थोपटे, आ. रविंद्र धंगेकर एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख आदि उपस्थित होते.
यावेळी चेन्नीथला पत्रकारांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, पुणे शहर आय. टी. राजधानी आहे पण शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे, रस्त्यावरून वाहन चालवणे अत्यंत कठीण बनले आहे,याचा आय. टी. कंपन्यांना फटका बसत आहे. आतापर्यंत १२० मतदारसंघातील आढावा घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. संघटन मजबूत करण्याचा हा कार्यक्रम असून जनतेमध्ये जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची माहिती पोहचवण्याचे काम केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने मविआला जसा पाठिंबा दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे, दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून केले जात आहेत. सरकार व पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. पोलीस आयुक्त, डीसीपी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शिपाई या सर्व पदांची पैसे घेऊन पोस्टिंग केली जात आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीच पोस्टींग चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहराला कलंक लावणाऱ्या घटना घडत आहेत.
राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पुर्व विदर्भात धान, कापसाचे पिक वाया गेले. आता मराठवाडा व विदर्भातील काही भागातील सर्व पिके नष्ट झाली आहेत. शेतकरी व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली पण मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात मदत काही पोहचत नाही. एमपीएससीच्या मुलांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकारने अद्याप केलेली नाही. ससून रुग्णालयासमोरची रस्ते विकास महामंडळाची सव्वादोन एकर जागा कवडीमोल भावाने दिली आहे. या जागेवर कॅन्सर हॉस्पिटल होणार होते, ५०० कोटी रुपये बाजार भाव असलेली ही जागा ९० वर्षांच्या लिजवर ७० कोटी रुपयांना दिली आहे.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारने मुंबई विकली, महाराष्ट्राची अस्मिता गुजरात दरबारी गहाण ठेवली आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला व गुजरातमधील ड्रग राज्यात आणले जात आहे. पुण्यात ड्रग्ज व गोळीबार नेहमीचेच झाले आहे. पुण्याची संस्कृती नष्ट केली आहे. टेंडर काढा व कमीशन खा एवढेच काम सरकार करत आहे. दोन दिवसापासून एस.टी. चा संप सुरु आहे. मविआ सरकार असताना एसटीच्या संपात राजकारण केले गेले. एस.टी. मंहामंडळाच्या विलिनीकरणाची मागणी केली होती. संप चिघळवण्यासाठी भाजपाने तीन हस्तक या संपात घुसवले होते, ते आता कुठे आहेत, विलीनीकरण का केले जात नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.