महाराष्ट्रमुंबई

Mumbai: नांदगाव नगरपालिकेच्या इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदगाव येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

नांदगाव येथील शिवसृष्टीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबरच नांदगाव नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नांदगाव, जि. नाशिक येथे आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने प्रादेशिक पर्यटन विकास योजना, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक हेक्टर क्षेत्रात शिवसृष्टी प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किशोर दराडे, आमदार सुहास कांदे, माजी खासदार संजय निरुपम, सामाजिक कार्यकर्त्या अंजुमताई कांदे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष व ते राज्याची अस्मिता आहेत. भारताचा अभिमान आहेत. ते राज्याची श्रद्धा आहेत. नांदगाव शहरात सर्वात मोठा आणि ऐतिहासिक प्रकल्प उभारण्यासाठी झालेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला शोभेल अशी शिवसृष्टी तयार झाली आहे. ही शिवसृष्टी नांदगाव शहराच्या विकासाचा ऐतिहासिक टप्पा ठरेल. शिवसृष्टीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याचा महाराष्ट्रातल्या कोट्यवधी बहीणींना लाभ झाला आहे. आगामी काळात या योजनेचा निधी वाढविला जाईल. या योजनेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. राज्याला विकासकामातून पुढे नेण्यात येत आहे. मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आमदार श्री. कांदे म्हणाले की, शिवसृष्टीच्या माध्यमातून नांदगावकरांचे स्वप्न साकारले आहे. दुसऱ्या टप्प्यात शिवसंग्रहालय साकारण्यात येईल. करंजवण पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. नांदगावकरिता पाणीपुरवठा योजनाही लवकरच कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बापूसाहेब कवडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी गायक, दिग्दर्शक, संगीतकार अवधून गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, गायिका वैशाली सामंत यांचा गीतसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button