Mumbai: मणिपूर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीनी ‘युजीसी’ची परवानगी घेऊन, सुधारित प्रस्ताव सादर करावा
-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
मणिपूर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हे स्वायत्त विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात आदिवासी भागात कौशल्य निर्मितीवर आधारित शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आवश्यक त्या सर्व परवानगी घेऊन विद्यापीठाने सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मणिपूर विद्यापीठ संदर्भात ऑनलाईन बैठक झाली.
बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अशोक मांडे,उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर,(ऑनलाइन) मणिपूर विद्यापीठाचे कुलगुरू हरिकुमार पल्लाथाडका(ऑनलाइन) उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नँक मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तसेच विद्यापीठाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कतर्फे प्रकाशित होणाऱ्या अहवालात विद्यापीठाचा समावेश असावा यासाठी प्रयत्न करावे. त्याचबरोबर इतर राज्यात शैक्षणिक शाखा सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या
आवश्यक त्या सर्व परवानगी घ्यावी,आणि सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा. राज्य शासन याबाबत सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.