Mumbai: शिवसेनेच्या उत्तर भारतीय संवाद संमेलनाला प्रचंड प्रतिसाद “राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण”
कार्यक्रमास मिळालेला प्रतिसाद पाहून पालघर जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पालघर जिल्हयातील नालासोपारा येथे दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी शिवसेना पालघर लोकसभा समन्वयक नवीन दुबे यांनी आयोजित केलेल्या “उत्तर भारतीय संवाद संमेलनास” स्थानीय जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता व मुळचे यु.पी-बिहार येथील उत्तर भारतीयांनी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमास मिळालेला प्रतिसाद पाहून पालघर जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी उत्तर भारतीयांचे वरिष्ठ शिवसेना नेता माजी खासदार संजय निरुपम ह्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या उत्तर भारतीयांना आश्वस्त करताना सांगितले की, मागील अनेक दशकांमध्ये स्थानीय सत्ताधाऱ्यांनी व
महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लॅण्ड माफिया व बिल्डर माफियांना हाताशी धरुन खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करवून घेऊन त्यात उत्तर भारतीयांसह अन्य सगळ्या गोरगरिब जनतेची फसवणूक करून त्यांना ती अनधिकृत घरे विकली आहेत.पुढे निरुपम म्हणाले की त्या इमारती जरी अनधिकृत असल्या तरी त्यात राहणारी सामान्य जनता निर्विवादपणे अधिकृत भारतीय नागरिक आहेत. त्यामुळे जर का प्रशासन अथवा अन्य कोणीही त्यावर कारवाईचा विचार करीत असल्यास महायुतीच्या नेतृत्वाखाली मी व नविन दुबे देशाच्या अधिकृत नागरिकांविरुद्ध कार्यवाही होऊ देणार नाही.
अनधिकृत बांधकामाला जबाबदार असणारे स्थानीय सत्ताधीश, भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी, लॅण्ड माफिया आणि बिल्डर माफिया यांचेवर कार्यवाही करून जोपर्यंत त्यांना जेलमध्ये टाकले जाणार नाही तोपर्यंत आम्ही त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाचे नुकसान होऊ देणार नाही. महायुतीचे शासन सदर बांधकामांना अधिकृत करुन घेण्याच्या ही प्रयत्नात आहे. या विषयावर नविन दुबे मागील एक वर्षापासून सतत महायुती सरकारच्या संपर्कात आहेत.
शासनाच्या लाडकी बहिण, लाडका भाऊ योजनेची संपूर्ण माहिती उपस्थितांना देऊन रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500/- रुपयांचे दोन हप्ते अर्थात 3000/- रुपये जमा होतील याची शाश्वती त्यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आयोजक नवीन दुबे यांनी उपस्थितांना सांगितले की, वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात व अतिशय सुनियोजित पद्धतीने लॅण्ड जिहाद सुरु असून आपले सगळे राजकीय मतभेद विसरून सगळ्या समविचारी राष्ट्रहित जोपासणाऱ्या लोकांनी ह्या विषयावर एकत्रीत येऊन वेळ पडल्यास संघर्षाच्या मार्गाने सर्वसामान्य जनतेत व शासन दरबारी जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे, पुढे ते म्हणाले की आज उत्तर भारतीयांना गावी जाण्यासाठी वांद्रे, दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस इत्यादी ठिकाणी जाऊन ट्रेन पकडावी लागते ज्यामुळे अनावश्यक पैसे खर्च होऊन त्रास होतो.
म्हणून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्या विरार-वसई- नालासोपारा येथे थांबविण्याची मागणी केली. तसेच गणेशोत्सव, होलिकोत्सव – इत्यादि सणांसाठी कोकणात जाणाऱ्या बसेस व रेल्वे गाड्या नालासोपारा येथून जास्त प्रमाणात सोडण्याची त्यांनी विनंती केली.
कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, तालुकाप्रमुख सुदेश चौधरी, मुंबई उत्तर भारतीय सभा कार्याध्यक्ष जयप्रकाश सिंह,उप जिल्हा प्रमुख जितेंद्र शिंदे, अजित खांबे, महिला जिल्हाप्रमुख शितल कदम, युवा प्रमुख विराज पाटिल, अल्पसंख्यांक प्रमुख शाहरुख खान, दिवाकर सिंह, प्रीन्स सिंह, उमेश गोवारीकर, सुभाष सावंत, डॉक्टर दीपक पांडे डॉक्टर सूर्यमणी सिंह अडवोकेट कुसुम पांडे इत्यादि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते, व त्यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास उपास्थित असलेल्या उत्तर भारतीयांसह सर्व नागरिकांचे, पत्रकार बांधवांचे व डॉक्टर्स , इंजिनीयरर्स,शिक्षक इ. सर्व मान्यवरांचे तसेच लोकगीत कलाकारांचे आयोजक नविन दुबे यांनी आभार मानले. उत्तर भारतीय विशेष व्यंजन लिट्टी चोखा ह्या जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली.