महाराष्ट्रमुंबई

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण व सामाजिक चळवळीतील लढवय्या हरपला: नाना पटोले

वसईच्या पर्यावरण रक्षणासाठी तसेच वसईला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या निधनाने साहित्य

मुंबई:फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी व दुःखद आहे. फादर फ्रन्सिस दिब्रिटो यांनी साहित्य, पर्यावरण व सामाजिक चळवळींमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. वसईच्या पर्यावरण रक्षणासाठी तसेच वसईला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण व सामाजिक चळवळीतील एक लढवय्या कार्यकर्ता हरपला असल्याच्या शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून नाना पटोले म्हणाले की, फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी पर्यावरण रक्षण, गुन्हेगारी विरोधात आवाज उठवणारे, अशी त्यांची ओळख होती. मराठी साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. तेजाची पाऊले, सृजनाचा मळा, मुलांचे बायबल, आनंदाचे अंतरंग, मदर तेरेसा, ख्रिस्ती सण आणि उत्सव, नाही मी एकला, असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. ‘सुवार्ता’ मासिकातून त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे विषय मांडले. त्यांनी धाराशीव येथील ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते, त्यांच्यावर संत साहित्याचा मोठा प्रभाव होता. ‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button