महाराष्ट्रमुंबई

राज्यातील साडेसहा हजार पत्रकारांना जोडले `आयुष्यमान भारत’शी !

`व्हॉईस ऑफ मीडिया’चा सक्रिय पुढाकार; पत्रकारांपर्यंत पोहोचून उपलब्ध केली सुविधा

मुंबई, ता. २२: `व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या संघटनेने महाराष्ट्र राज्यातील साडेसहा हजार पत्रकारांना आरोग्य विम्याशी जोडले आहे. या सर्व पत्रकारांना `आयुष्यमान भारत’चे कार्ड उपलब्ध करून देऊन `व्हॉईस ऑफ मीडिया’ने आरोग्याची हमी घेतली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी आरोग्य कॅम्प घेत सर्व तपासण्या करत हा विमा काढण्यात आला आहे.

`व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आरोग्यविषयक पावलामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पत्रकारांना मोठी सुविधा निर्माण झाली आहे.
`व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेने जगातील ४३ पेक्षा अधिक देशांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. महाराष्ट्रातून सुरुवात झालेल्या या संघटनेने पत्रकारांच्या निवास, निवृत्तिवेतन, पत्रकार भवन, आरोग्य व भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी राज्यभरातील पाच हजारपेक्षा जास्त पत्रकारांचा दहा लाख रुपयांचा विमा काढून दिला होता. त्यानंतर आता `आयुष्यमान भारत’च्या माध्यमातून सुमारे पाच लाख रुपयांच्या वैद्यकीय सुविधांचा समावेश असलेली योजना प्रत्यक्ष पत्रकारांपर्यंत पोहोचून पत्रकारांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला.
पत्रकार व त्यांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी व `आयुष्यमान भारत’ कार्ड वाटप कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्व आरोग्यविषयक चाचण्या मोफत करण्यात आल्या. त्याचे रिपोर्ट्स त्यांना सुपूर्द करण्यात आले.
पत्रकार व त्यांच्या परिवाराचे आरोग्य हे `व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पंचसूत्रीतील एक सूत्र असल्याने प्रत्येक वर्षी अशा प्रकारची मोफत आरोग्य तपासणी केली जाते.
आपल्या कामाच्या व्यापात, अवेळी जेवण इत्यादीमुळे पत्रकार स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. ही बाब लक्षात घेऊन `व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी राज्यभर आरोग्य कॅम्प घेण्यास सांगितले. या आरोग्य कॅम्पला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. आगामी काळात पत्रकार आणि त्यांच्या नातेवाईकांचाही विमा काढला जाणार आहे, त्यामध्ये पत्रकारांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य संयोजक तथा प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button