पोलिस व मनपा अधिकाऱ्यांवर नाराजगी व्यक्त करीत जयभीम नगर प्रकरणाचे दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे राहुल नार्वेकरांचे आदेश
पावसाळी अधिवेशनात, स्थगण प्रस्तावाच्या माध्यमातून प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष नाना पटोळे व विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी पवई, हिरानंदानी येथील जयभीम नगर मध्ये 25-30 वर्षांपासून राहत
मुंबई: पावसाळी अधिवेशनात, स्थगण प्रस्तावाच्या माध्यमातून प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष नाना पटोळे व विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी पवई, हिरानंदानी येथील जयभीम नगर मध्ये 25-30 वर्षांपासून राहत असलेल्या अंदाजे 650 मागासवर्गीय परिवारांना विकासकांनी मनपा व पोलिस यांच्याशी हातमिळवणी करून मारहाण करीत बुलडोजर चालवून बेघर केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ताबडतोब बेघर राहिवासीयना निवारा देण्यात यावा तसेच या प्रकरणाची सखोल तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु दोन आठवडे होऊनसुद्धा अद्याप मनपा आणि पोलिस प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने मा. मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज त्यांच्या दालनात नसीम खान यांच्यासह जयभीम नगरचे रहिवाशी, नगरविकास विभागाचे अधिकारी, अतिरिक्त मनपा आयुक्त, पोलिस उपायुक्त परीमंडळ 10, मनपा उपायुक्त परीमंडळ 6, पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मनपा एस विभागाचे सहायक पालिका आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली.
या बैठकीत नसीम खान यांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली की, आपण दिलेल्या आदेशाचे 2 आठवडे होऊनसुद्धा पोलिस आणि मनपा कडून पालन न झाल्याने अद्याप पर्यत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. पवईतील हिरानंदानी येथील जयभीम नगर रहिवासीयांवर ज्याप्रमाणे पोलिस आणि मनपाने नियमबाह्य कार्यवाही केली आहे अशा पोलिस अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे आणि भ्रष्ट मनपा अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावे त्याचबरोबर भर पावसाळ्यात फुटपाथवर राहण्यास मजबूर झालेल्या सर्व बेघर रहिवासीयांना त्वरित निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. नसीम खान यांच्या मागणीनुसार विधानसभा अध्यक्षांनी पोलिस आणि मनपावर नाराजगी व्यक्त करीत दोन आठवड्यात सर्व बेघर रहिवासीयांना निवारा उपलब्ध करून देण्याचे तसेच एका वरिष्ठ पातळीवर या सर्व प्रकरणाची सखोल तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
या बैठकीत प्रकाश बिऱ्हाडे, अशोक गायकवाड, निलेश वाघमारे, रोहित कांबळे अँड. सिब्ते हसन खान, राकेश सिंह, तसेच जयभीम नगरचे चेतन शेळके, रेणुका लिंबोळे, दीपाली खंदारे, रेणुका कदम आणि इतर रहिवाशी उपस्थित होते.