ठाणे जिल्ह्यातील शिळगावात महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना उचित शिक्षा व्हावी याकरीता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी- डॉ. नीलम गोऱ्हे
मौजे शिळगावातील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार करुन हत्या केली. या घटनेतील आरोपीना शिक्षा
मुंबई: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असलेले मौजे शिळगावात एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी 9 जुलै रोजी उघडकीस आली. मौजे शिळगावातील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार करुन हत्या केली. या घटनेतील आरोपीना शिक्षा व्हावी याकरीता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
महिलांना सर्व क्षेत्रात प्राधान्य देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करणे हे शासनाचे धोरण आहे. अशा परिस्थितीत सदरील घटना महिलांच्या मनोधैर्यावर विपरीत परीणाम करु शकतात. मंदिर परिसरात आरोपींनी एका विवाहीत महिलेवर सामूहिक अत्याचार केले. ही घटना अत्यंत लाजीरवाणी व माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हंटले आहे.
डॉ.गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात अशा घटना भविष्यात्त घडु नये याकरीता राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे येथे सीसीटीव्ही बसविण्यात यावे व तेथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी. धार्मिक स्थळामध्ये कार्यरत सर्व कर्मचारी, पुजारी व इतर पूर्णवेळ सेवक यांची नजीकच्या पोलीस स्टेशन मार्फ़त चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. तसेच महिलेचे आप्त व कुटुंबियांना मानसोपचार सेवा व समुपदेशन पुरविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.