आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने न्यायदान प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न प्रशंसनीय- मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या 33 व्या स्थापना दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन न्यायाधिकरणाच्या सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर उपस्थित होत्या
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण न्यायदान प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्याय व्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास गतिमानता येते, हे न्यायाधिकरणाने दाखवून दिले आहे. न्यायदानात आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणून ही प्रक्रिया गतिमान करण्याचा न्यायाधिकरणाचा प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी आज काढले.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या 33 व्या स्थापना दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन न्यायाधिकरणाच्या सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर उपस्थित होत्या, तर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ, ‘महारेरा’चे अध्यक्ष न्या. संभाजी शिंदे, अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, उपाध्यक्ष न्या. पी आर बोरा, सदस्य देवाशिष चक्रवर्ती, मेधा गाडगीळ, रजिस्टार श्रीमती पी.एस झाडकर, विशेष कार्य अधिकारी सुरेश जोशी उपस्थित होते.
मुख्य न्यायमूर्ती श्री. उपाध्याय म्हणाले की, प्रशासकीय सेवेमध्ये नागरिकांप्रती जबाबदारीने काम करावे लागते. सेवा देताना पदोन्नती, बदली, नियुक्ती, निवृत्ती आदी प्रकरणांमध्ये न्यायाधिकरण महत्त्वाची भूमिका बजावते. सेवेतील अनेक प्रकरणांमध्ये न्यायाधिकरणाने दिलेले निकाल पथदर्शी ठरतात. सेवाविषयक 95 टक्के प्रकरणांमध्ये न्यायाधिकरण न्याय देत आहे. त्यामुळे निश्चितच पारंपरिक न्यायव्यवस्थेवरील दबाव कमी होत आहे.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामार्फत ई- मॅट नावाने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यावर न्यायिक प्रकरणांची सद्य:स्थिती, आदेश व न्याय निर्णय यांची माहिती मिळते. तसेच न्यायाधिकरणामार्फत लवकरच न्याय निर्णय व आदेशांचे भाषांतर मराठीमध्ये करण्याकरिता ‘सुवास ॲप’ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी अध्यक्ष न्या. भाटकर यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान सेवा विषयक कायदे, न्यायाधिकरणाची माहिती, सुविधा विषयक पुस्तिकेचे मुख्य न्यायमूर्ती श्री. उपाध्याय यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विधीज्ञ वैशाली जगदाळे व पूर्वा प्रधान यांचा न्यायाधिकरणातील अनुभव आधारित संवाद देखील सादर करण्यात आला. विधीज्ञ एम.डी लोणकर, पूनम महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विशेष कार्य अधिकारी श्री. जोशी यांनी केले, तर आभार रजिस्ट्रार श्रीमती झाडकर यांनी मानले. कार्यक्रमाला न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायाधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.