नागपूरभारतमहाराष्ट्र

नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत, अधिसंख्य कर्मचाऱ्यांना वारसा हक्क सोडून सर्व लाभ

नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचा-यांना वारसा हक्क सोडून, लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशीनुसार, इतर सर्व लाभ देण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मुंबई: नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचा-यांना वारसा हक्क सोडून, लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशीनुसार, इतर सर्व लाभ देण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य अभिजित वंजारी यांनी नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचाऱ्यांविषयी उपस्थिती केलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, राज्य शासनाद्वारे दि. २० सप्टेंबर २०१९ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये नागपूर महानगरपालिकेतील ४४०७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करून समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत ज्या कर्मचाऱ्यांची सेवा २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे, अशा एकूण ३८०५ पात्र ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर सद्यस्थितीत समावून घेण्यात आले आहे. उर्वरित ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना पात्र झाल्यानंतर अधिसंख्य पदावर सामावून घेण्याची प्रक्रिया महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचा-यांना देण्यात येत असलेल्या लाभात वेतन भत्ते, आठवडा सुट्टी, वैद्यकीय रजा, वैद्यकीय सुविधा, निवासस्थान व सेवानिवृती वेतन योजना इत्यादींचा समावेश आहे. अधिसंख्य पदावर कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना लागू असणारे परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना, कुटुंब निवृत्तिवेतन, मृत्यु उपदान, रुग्णता निवृत्तिवेतन, सेवानिवृत्ति उपदान इ. लाभ अनुज्ञेय आहेत, तसेच रजेचे रोखीकरण, गटविमा योजना इ. लाभ अनुज्ञेय आहेत.

शासन निर्णय दि. २० सप्टेंबर २०१९ नुसार केवळ कार्यरत ऐवजदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण झाली असल्याने, ही अधिसंख्य पदे, कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास ती त्या दिनांकापासून आपोआप व्यपगत होत असल्याने, ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नियुक्ती देण्यात्ताठी कोणतेही अधिसंख्य पद निर्माण करण्यात येणार नाही अथवा व्यपगत झालेले पद पुनर्जिवित करता येत नाही. यामुळे ज्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर समावून घेण्यात आले आहे, त्यांच्या वारसांना नियुक्ती देणे शक्य होत नाही. या अटीशिवाय लाड – पागे समितीच्या इतर सर्व शिफारशी व लाभ पात्र ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेद्वारे देण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, विजय गिरकर, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button