काँग्रेसला आजही हरवणे हाच आणीबाणीचा निषेध उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक
आणीबाणीच्या जखमा भळभळत्या आहेत. तो काळा दिवस आहे. ज्यांनी आणीबाणी देशावर लादली त्यांचे आजही वर्तन बदलेले नाही. त्यामुळे त्यांंना प्रत्येक निवडणूकीत हरवणे हाच मार्ग आहे,
मुंबई: आणीबाणीच्या जखमा भळभळत्या आहेत. तो काळा दिवस आहे. ज्यांनी आणीबाणी देशावर लादली त्यांचे आजही वर्तन बदलेले नाही. त्यामुळे त्यांंना प्रत्येक निवडणूकीत हरवणे हाच मार्ग आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी आज येथे केले. ज्यांनी संविधानातील मुल्यांची पायमल्ली केली त्याच काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज आम्हाला संविधानाची प्रत दाखवत आहेत. तो त्यांचा बालिशपणा आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी केली.
संविधानिक मूल्यांची पायमल्ली करणार्या काँग्रेसचा व आणीबाणीच्या काळ्याकुट्ट अध्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज मुंबई भाजपातर्फे ‘आपातकाल और लोकतंत्र की हत्या – एक काला अध्याय’ या विशेष परिसंवादाचे आयोजन वसंत स्मृती येथे केले होते. प्रमुख वक्ते म्हणून उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक व विशेष अतिथी म्हणून नफिसा मुजफ्फर हुसैन आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थितीत होते.
राम नाईक आणि नफिसा हुसेन यांनी आणीबाणीच्या काळात जनतेवर झालेल्या अत्याचारांचे वास्तवदर्शी चित्र समोर मांडले. अनेक दाहक प्रसंग त्यांनी सांगितले.
तर यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले की, काँग्रेसचा अहंकार त्याही वेळा आणि आजही कायम आहे. जेवढा अपमान इंदिरा गांधींच्या पापी काँग्रेसने संविधानाचा केला तेवढा आजवर कुणीच केला नाही. देशाच्या स्वातंत्र्याचे पहिले आंदोलन इंग्रजाविरोधात होते तर दुसरे आंदोलन काँग्रेस विरोधात होते. इंदिरा गांधी काँग्रेस प्रति इंग्रजांसारखे वागले. त्यांच्या पापी कृत्यांना प्रामाणिकपणे समजून घेतले पाहिजे. आजची काँग्रेस त्यावेळच्या काँग्रेस सारखी अहंकारी जुलमी आणि संविधान विरोधी आहे. इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण यांच्यातील निवडणूक इंदिरा गांधींनी भ्रष्ट पद्धतीने जिंकली होती. सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला. याबाबत न्यायालयात खटला चालू असताना इंदिरा गांधी यांची खुर्ची न्यायाधीशापेक्षा मोठी होती. संविधानात बदल करून त्याच्या चिंधड्या उडवण्याचे काम इंदिरा काँग्रेसने केले. प्रधानमंत्री नाहीतर प्रधानसेवक आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. संविधानाच्या ग्रंथावर डोकं ठेवून ते नतमस्तक होतात. मात्र, त्यांना राहुल गांधी संसदेत संविधान दाखवतात हा बालिशपणा आहे.
संविधानाचा ढाच्या बदलता येणार नाही असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. मात्र, काँग्रेसने संविधानाच्या ढाच्याला सुरुंग लावण्याचे काम केले. इंदिरा गांधींनी घटनादुरुस्ती करत सामान्य माणसाला न्यायालयात जाण्यास रोखले. पंतप्रधान विरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला नाहीत अशी घटना दुरुस्ती केली. मिसा कायद्यांत बदल करुन पत्रकारांवर बंदी घातली आणि आजची काँग्रेस पारदर्शकता संविधान यावर धडे देते यापेक्षा दुसरे हास्यास्पद काय असू शकते? देशात अतिसंशय निर्माण करण्याचे पाप काँग्रेसने केले. त्यामुळे आजचा दिवस आणीबाणी विरोधातील आंदोलकांना धन्यवाद देण्याचा आहे. यापुढे संविधानाकडे कोणी वाकड्या नजरेने बघितल्यास भारतीय जनता पक्ष त्याविरुद्ध उभा राहील असे मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी ठणकावून सांगितले. आजही काँग्रेस या देशातील न्यायपालिका, संसद, तपास यंत्रणा याबाबत संशय निर्माण करु पाहतेय, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.