महाराष्ट्रमुंबई

‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ झाली

सरकारचा नाकर्तेपणा याला जबाबदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका

मुंबई :- येणाऱ्या प्रत्येक दिवशी पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आज ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ झाली आहे अशी टीका त्यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात की, गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून  देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे असे ते म्हणाले.

अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत अशीही शंका त्यांनी व्यक्त केली.

‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे अशी आठवण करून देत असतानाच मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे असा आरोपही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button