Uncategorizedमहाराष्ट्रमुंबई

चित्रपट अभिनेता आर्यनच्या नावावर लाखोंचा गैरव्यवहार, पोलिसांनी पकडले

सिनेअभिनेता कार्तिक आर्यन याची भेट घडवून आणतो असे सांगून त्याच्या लव इन लंडन या चित्रपटाच्या निर्मितीसाठी गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका व्यावसायिक महिलेची

श्रीश उपाध्याय,मुंबई: सिनेअभिनेता कार्तिक आर्यन याची भेट घडवून आणतो असे सांगून त्याच्या लव इन लंडन या चित्रपटाच्या निर्मितीसाठी गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका व्यावसायिक महिलेची सुमारे ८२ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या आरोपीस आंबोली पोलिसांनी अटक केली. कृष्णा शर्मा ऊर्फ कृष्णाकुमार रामनिवास शर्मा असे या २९ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कृष्णा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील आंबोली, वाकोला, विमानतळ, दिल्लीच्या कनॉट प्लेस आणि चेन्नईच्या ई ३ टेनामपेट पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीच्या पाच ते सहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

४० वर्षांची तक्रारदार महिला ऐश्‍वर्या प्रेमजीत शर्मा ही गोरेगाव परिसरात राहते. एप्रिल २०२२ रोजी तिची कृष्णा शर्मासोबत ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो बॉलीवूडशी संबंधित असून त्याच्या परिचित अनेक बॉलीवूड कलाकार आहेत. आर्यन कार्तिकसोबत लव इन लंडन या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्याने तिला आर्यन कार्तिकसोबत मिटींग करुन देतो असे सांगितले होते. तसेच या चित्रपटासाठी तिने निर्मिती करावी, त्यातून तिला चांगला फायदा होईल असे सांगून तिचा विश्‍वास संपादन केला होता. आर्यनसोबत मिटींगसह चित्रपट निर्मितीसाठी त्याने तिच्याकडून एप्रिल २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत टप्याटप्याने ८२ लाख ७५ हजार रुपये घेतले होते. ही रक्कम घेऊन त्याने तिची आर्यनसोबत मिटींग घडवून आणली नाही किंवा चित्रपटाबाबत काहीही माहिती न देता तिने दिलेल्या पैशांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच ऐश्‍वर्या शर्माने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे परत न करता तिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने कृष्णा शर्माविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या महिन्यांत कृष्णाला गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने बंगलोरच्या हॉटेल ताज वेस्टाएंट येथून अटक केली होती. त्याच्या अटकेपूर्वी त्याच्या तीन सहकार्‍यांना पोलिसांनी अटक केली होती.

चौकशीत कृष्णा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. फसवणुकीसाठी त्याने एक टोळी बनविली होती. या टोळीने मुंबईसह दिल्ली आणि चेन्नई शहरात अनेक फसवणुकीचे गुन्हे केले आहे. बॉलीवूड कलाकारांशी ओळख असून त्यांना विदेशात जाण्यासाठी डॉलरची गरज आहे असे सांगून त्यांनी आतापर्यत अनेकांना गंडा घातला आहे. या गुन्ह्यांतील तक्रारदार महिलेस कार्तिकसोबत मिटींग घडवून, त्याच्यासोबत चित्रपट निर्मिती करतो असे सांगून तिला या चित्रपट निर्मिर्तीसाठी गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. तिच्याकडून ८२ लाख ७५ हजार रुपये घेतल्यानंतर तो पळून गेला होता. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या कृष्णा शर्माचा ताबा आंबोली पोलिसांनी घेतला होता. याच गुन्ह्यांत त्याला अटक केल्यानंतर स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button