भारतमहाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे देवेंद्र फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक: अतुल लोंढे

भाजपाने लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवली तर मोदींनीच राजीनामा द्यावा.

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा देत निवडणुक लढवली तर महाराष्ट्रात ४५ जागा जिंकणार असा भाजपाचा अहंभाव होता परंतु देशातील जनतेप्रमाणे राज्यातील जनतेनेही भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात भाजपाची कामगिरी अत्यंत खराब झालेली आहे याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीव झाली, आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्याआधीच राजीनामा देण्याचे नाटक ते करत आहेत, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

सत्तेच्या जबाबदारीतून मुक्त करा, या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राज्यात असंवैधानिक सरकार चालवत आहे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणत दोन पक्ष फोडून आलो हेही फडणवीस यांनीच जाहीरपणे सांगितले आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिरावून मित्रांना दिले व त्या पक्षाचे चिन्हही काढून घेतले. भारतीय जनता पक्षाने सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हे पक्षफोडीचे जे राजकराण केले ते महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही. भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप होता आणि निवडणुकीची संधी मिळतात जनतेने देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाला धडा शिकवला आणि शरद पवार व उद्धव ठाकरे ह्यांचेच पक्ष खरे आहेत व पक्षाचे नेतेही, व चिन्हही त्यांचेच आहे हे दाखवून दिले.

भाजपाच्या पराभवाची जबादारी घेऊन देवेंद्र फडणवीस राजीनामा देत असतील तर खरी जबाबदारी तर नरेंद्र मोदी यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा कारण भाजपाने लोकसभा निवडणुक ही नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरच लढवली आहे. देवेंद्र फडणवीस राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडत असतील पण नरेंद्र मोदी राजीनामा देणार का? हा खरा प्रश्न आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button