शिक्षणात मनुस्मृती येऊ नये म्हणूनच आव्हाडांचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर
पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा मनुस्मृतीकडे नेण्याचे काम राज्यातील तीन इंजिनचे सरकार करत आहे. महाराष्ट्रात मनुस्मृती जतन होऊ नये,
मुंबई: पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा मनुस्मृतीकडे नेण्याचे काम राज्यातील तीन इंजिनचे सरकार करत आहे. महाराष्ट्रात मनुस्मृती जतन होऊ नये, विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये मनुस्मृती येऊ नये, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये आंदोलन केले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे.
राज राजापूरकर म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकरांचे संस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आणि खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुरोगामी विचारधारा जिवंत ठेवली आहे. म्हणूनच आमचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बहुजनांच्या हितासाठी मनुस्मृती विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आंदोलनावेळी मनुस्मृतीचे फोटो आणले असता चुकून त्यांच्या हातात मनुस्मृती लिहिलेल्या पानावर बाबासाहेबांचा देखील फोटो होता, तो त्यांच्याकडून चुकीने फाडला गेला. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र त्या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांना या संदर्भातील चूक लक्षात घेत असताना संपूर्ण जनतेची माफी मागितली आहे, असे देखील राज राजापूरकर म्हणाले.
पुढे राज राजापूरकर म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितल्यानंतर देखील भाजपच्या वतीने राज्यात त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनातून भाजपच्या वतीने दाखवण्यात येत आहे की फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराना ते आदर्श मानतात. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातील महापुरुषांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या एकाही कार्यकर्त्यांने या विरोधात आंदोलन का केले नाही. आमच्या ओबीसीचे दैवत असलेले महात्मा ज्योतिबा फुले आणि आई सावित्रीबाई फुले यांच्यावर ज्यावेळी त्यांनी टीका केली, त्यावेळीही भाजपच्या एकाही नेत्याने तोंड उघडले नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो, महाराष्ट्राचे आराध्यदैवत मानतो, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरी यांच्यासोबत केली, त्या कोश्यारींबद्दल भाजपचा एकही नेता का बोलला नाही, असा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी तुमच्या तोंडाला कोणता कुलूप लागले होते का, असा प्रश्न देखील राज राजापूरकर यानी विचारला आहे.