महाराष्ट्रमुंबई

माफी नाही, कठोरातील कठोर कारवाई करा : ॲड.धर्मपाल मेश्राम जितेंद्र आव्हाडांच्या कृत्यावर आक्रमक पवित्रा : संविधान चौकात आव्हाडांच्या फोटोला मारले जोडे

महाडचा सत्याग्रह कशासाठी होता, आंदोलनाची भूमिका काय होती, याचा कुठलाही अभ्यास नसताना केवळ स्टंटबाजीच्या नादात परमपूज्य भारतरत्न डॉ.

नागपूर. महाडचा सत्याग्रह कशासाठी होता, आंदोलनाची भूमिका काय होती, याचा कुठलाही अभ्यास नसताना केवळ स्टंटबाजीच्या नादात परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचे घृणीत कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या कृत्यावर माफी मागून पळवाट काढणा-या आव्हाडावर कठोरातील कठोर कारवाई करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.

महाड येथे आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याच्या जितेंद्र आव्हाडांच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविताना आज गुरूवारी (ता.३०) संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आव्हाडांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

नागपुरातील संविधान चौकामधील आंदोलनामध्ये ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी आक्रमक पवित्रा घेत आव्हाडांच्या कृत्यावर शरद पवारांनी स्वत: स्पष्टीकरण द्यावे, अशी देखील मागणी केली. आव्हाडांचे कृत्य हे घृणीत लांछणास्पद आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राच्या चेह-यावर लागलेले काळे कापड आहे. असे कृत्य करून आंबेडकरी समुदायाचा अपमान करणा-या अशा घृणीत व्यक्तीला जोपर्यंतअटक होत नाही, जोपर्यंत कठोरातील कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहू, असा इशाराही त्यांनी दिला. जे हृदयात असतात, जे डोक्यात असतात ते फाडले जात नाहीत, असे सांगतानाच ॲड. मेश्राम यांनी आव्हाडांच्या जे पोटात होते ते ओठात आले आणि ओठातले कृतीत आले. त्यामुळे बाबासाहेबांचे पोस्टर फाडण्याचे लांछणास्पद कृत्य या छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांनी केले आहे. जे अत्यंत चुकीचे आहे. त्या विरोधात आमचा आक्रोश आहे, अशा परखड शब्दांत निषेध नोंदविला.

परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे देशातील १४० कोटी जनतेचे दैवत आहेत. या देशातील १४० कोटी जनतेच्या संविधानाची निर्मिती करणा-या दैवताचा जर अपमान होत असेल तर अशा विरोधींनी माफी मागून चालणार नाही. हे आंदोलन माफी मागण्यासाठी नाही तर त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी आहे. यावर स्वत: शरद पवारांनी यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, अशी मागणी देखील ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर राव कोहळे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, सुभाष पारधी, अजय बोढारे , चरणसिंह ठाकुर, नरेश मोटघरे, मनोज चवरे, शंकर मेश्राम, सुधीर जांभुळकर, इंद्रजीत वासनिक, मोहिनी रामटेके, उषाताई पॅलेट, नूतन शेंदुरनिकार, महेंद्र प्रधान, नेताजी गजभिये, स्वप्निल भालेराव, सुनील तुर्कल, दिलीप गोईकर, नितिन वाघमारे, प्रीति बहादुरे, अमर लोहखरे, दीपक मघाडे, संदीप पाटील, रामकृष्ण भीलकर, सचिन चंदनखेडे, किशोर बेहडे, बंटी पैसाडेली, आकाश सातपुते, निखिल गोटे, ज्योती रामटेके, विशाल वानखेडे, विजय ढोके, रंजीत गौरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button