महाराष्ट्रमुंबई

पुणे अपघात प्रकरण दडपण्याचा राज्य सरकार आणि प्रशासनाचा प्रयत्न: सीबीआयमार्फत चौकशी करा: नाना पटोले

राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत.

मुंबई: राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही, पुण्याच्या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फतच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, पुण्यात गर्भश्रीमंत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने कारखाली दोघांना चिरडले, त्याआधी त्याने मद्यपान केले होते, यावेळी त्याच्यासोबत एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण हे समजले पाहिजे. पुण्यातील घटनेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वकीलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला. पुण्यात ड्रग्जचा अवैध धंदा जोरात सुरु आहे. पुणे व नागपूर शहरातही अवैध पबने थैमान घातले आहे. कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील ३६ अवैध पब पाडावे लागले.

गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरूण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपाने केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी खुलासा करावा व या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशयास्पद वाटते, त्यांचा राजीनामा घ्यावा. नागपूर या गृहमंत्र्यांच्या शहरातही दोन मुलींनी दोन युवकांना गाडीखाली चिरडून मारले तरीही त्यांना १० तासात जामीन मिळाला. जळगावातही गाडीखाली चिरडण्यात आले व त्यातही आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाला. पुण्याच्या ससून हॉस्पिटमधील डॉ. तावडेने आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. ससूनमध्ये ड्रग माफिया ललित पाटीलला सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, येथून ललित पाटील पळूनही गेला होता. ससूनचे डॉक्टर तावरे यांना अधिक्षक पदासाठी नियुक्त करावे यासाठी एक मंत्री व आमदार यांनी शिफारस केली होती. तो मंत्री व आमदार कोण हे जनतेला समजले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप सर्व क्षेत्रात वाढला असून गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. इंदापूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुन्हेगारांची अशी हिम्मत होतेच कशी, राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या राज्याला बदनाम करण्याचे पाप भाजपाने केले आहे असेही नाना पटोले म्हणाले.

अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्यास काँग्रेसचा विरोध..
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा डाव भाजपाने रचला असून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस हे होऊ देणार नाही. मनुस्मृतीत महिलांना काहीच स्थान नाही. संविधान हटवून त्या जागी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न आहे तो कदापी यशस्वी होणार नाही. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश खपवून घेणार नाही, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, माजी खासदार हुसेन दलवाई, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. I

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button