महाराष्ट्रमुंबई

प्रतापराव भोसले यांच्या निधनाने सुसंस्कृत, निष्ठावान नेतृत्व हरपले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा शोकसंदेश.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. प्रतापराव भोसले यांनी आयुष्यभर काँग्रेस विचार सोडला नाही.

मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. प्रतापराव भोसले यांनी आयुष्यभर काँग्रेस विचार सोडला नाही. पक्षाच्या कठीण काळातही संघटनेचे काम व पक्षाचा विचार रुजवण्याचे काम त्यांनी केले. प्रतापराव भोसले यांच्या निधनाने एक सुसंस्कृत निष्ठावान नेता हरपला आहे, अशा शोक भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रतापराव भोसले यांचा राजकीय प्रवास सातारा जिल्ह्यातील भुईंज गावच्या सरपंच पदापासून सुरु झाला. वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी चारवेळा विजय संपादन करुन राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्व केले, कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघातून १९८४, १९८९ आणि १९९१ अशा तीन लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करुन ते लोकसभेत गेले, या काळात त्यांनी अनेक महत्वाच्या समित्यांवर काम केले.
१९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली, त्यांच्या कार्याकाळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळवून राज्यात सत्ता आणली, प्रतापराव भोसले यांना पक्षाने जी जबाबदारी दिली ती त्यांनी समर्थपणे पार पाडली, संधीचे सोने करत त्या पदाला न्याय देण्याचे काम केले.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी राजकारणाबरोबर कृषी, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातही भरीव काम केले. शासनाच्या विविध योजना सातारा जिल्ह्यात राबवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रतापराव भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भोसले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button