सुप्रीम कोर्टामुळेच राम मंदिर उभं राहिलंय… राम मंदिरासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचंही योगदान !
राम मंदिराची निर्मिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालीय. राम मंदिरासाठी लाखों कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही निधी दिला आहे.
मुंबई: राम मंदिराची निर्मिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालीय. राम मंदिरासाठी लाखों कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही निधी दिला आहे. जे नेते रामलल्लाच्या दर्शनाला गेले ते आमचे उमेदवार आहेत. भाजपने राममंदिराचा वापर केवळ आपल्या राजकारणासाठी केला, असं वक्तव्य अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य (CWC), खासदार राजीव शुक्ला यांनी केलं आहे.
देशाच्या संरक्षणासाठी कॉंग्रेसने कठोर उपाय योजना केल्या. राजीवजी, इंदिराजी यांनी यासाठी बलिदान दिलंय. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात तातडीने कमांडो पाठवून अतिरेक्यांचा खातमा केला. केंद्रीय यंत्रणा, मुंबई पोलिसांनी तपास करून सज्जड पुरावे तयार केले. कॉंग्रेसने कसाबला विनाविलंब फाशी दिली. एवढंच नव्हे कॉंग्रेसनेच पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्रांच्या यादीत आणलं, असा दावाही राजीव शुक्ला यांनी केला.
राम हे आमचं दैवत आहे. राम मंदिरासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही योगदान दिलं आहे. आम्हीही पुजाअर्चा करतो, पण कॅमेरा घेवून आम्ही पुजेला जात नाही. राममंदिराचा इव्हेंट भाजपने आपल्या राजकीय स्वार्थासाठी केलाय, हे लोकांच्या लक्षात येत आहे, असंही शुक्ला यांनी सांगितलं.
देशातलं राजकीय वातावरण बदलतंय. सर्वच पातळ्यांवर नाकाम ठरलेलं मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही हे भाजपच्या लक्षात आलंय. आता ४०० जागांचा दावा सोडून म्हैस, मंगळसूत्र, मुस्लीम, जिहाद अशा मुद्द्यांवर मोदी घसरलेत. कॉंग्रेसने मात्र सर्वसामान्य माणसासाठी पाच न्यायांची घोषणा लोकांना भावते आहे. त्यामुळे मुद्दाहीन भाजप गळपटली आहे, अशी टिप्पणीही राजीव शुक्ला यांनी केली.
यावेळी वरिष्ठ प्रवक्ते निजामुद्दीन राईन, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, प्रवक्ते आनंद शुक्ला, प्रवक्ते भरत सोनी, प्रवक्ते शकील चौधरी आणि मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष संदीप शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.