समाजाच्या नेतृत्वाबाबत नसीम खान यांनी उपस्थित केलेल्या मुद्दा एकदम योग्य …. रमेश चेन्नीथल्ला
अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजाच्या भावनांची पक्षश्रेष्ठींकडून दखल; नाराजी नाही, प्रचार कार्यात सक्रीय होणार: नसीम खान
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजाला प्रतिनिधित्व दिले नसल्याने अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजात पक्षाबद्दल चुकीचा संदेश जात असून त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल असे स्पष्ट मत पक्षश्रेष्ठींकडे मांडणारे प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांचा हा मुद्दा एकदम योग्य असल्याचे ठाम मत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी आज प्रदेश कॉँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या राजीनाम्यावर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेस सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष असून नसीन खान यांनी अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजासाठी जो मुद्दा मांडला त्याची अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीच्या पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल घेतली असून यापुढे कॉँग्रेस पक्षामार्फत सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल असे आश्वासन पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहे. नसीम खान यांनी पुण्यात राहुल गांधी यांची भेट घेतली व मी त्यांना निवेदन केले की जो राजीनामा त्यांनी दिलेला आहे तो परत घ्यावा व प्रचार कार्यात सक्रीय व्हावे असे चेन्नीथल्ला म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, अल्पसंख्याक समाज, उत्तर भारतीय समाजाची भावना मी अखिल भारतीय काँग्रेसला कळवली होती, माझ्या पत्राची पक्षाध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे जी, राहुल गांधी जी, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल जी, प्रभारी रमेश चेन्नीथला जी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जी, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात जी यांनी दखल घेतली. समाजाच्या वतीने मी काही मुद्दे मांडले होते, येणाऱ्या काळात त्यावर पक्ष योग्य तो न्याय देईल. मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता असून राहुल गांधी व मल्लिकार्जून खर्गे यांच्या लढाईत मजबूतपणे सहभागी होत इंडिया आघाडीचा पंतप्रधान व्हावा यासाठी काम करणार, असे नसीम खान यांनी स्पष्ट केले आहे.
पत्रकार परिषद संपल्यावर पक्ष कार्यालयाच्या हॉल मध्ये खासदार चंद्रकांत हंडोरे, कोषाध्यक्ष डॉ. अमरजित मनहास, मा. मंत्री सुरेश शेट्टी, प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रो. चांदुरकर, राजेश शर्मा, बलदेव खोसा, भावना जैन, सतीश मनचंदा, प्रदुमन यादव, राणा सिंह अवनीश सिंह, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे, सुनिल अहिरे, निजामुद्दीन राईन, भरत सिंह यांच्या उपस्थित रमेश चेन्नीथल्ला व नसीम खान यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांना संबोधित केले यावेळी रमेश चेन्नीथल्ला यांनी कार्यकर्त्यांना निवेदन केले की ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी नसीम खान यांच्या समर्थनाथ राजीनामा दिलेला आहे त्यांनी तो परत घेऊन पूर्ण ताकदीने प्रचार कार्यात सक्रिय व्हावे व मुंबईसह संपूर्ण राज्यातील कॉँग्रेस उमेदवार व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणावे आणि राज्यात महाविकास आघाडीचे तर देशात इंडिया गठबंधनाचे सरकार आणण्याच्या कामात सहभागी होण्याचे आव्हान चेन्नीथल्ला यांनी केले. नसीम खान यांनी सुद्धा समाजाकरिता मांडलेल्या मुद्यांची कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून दखल घेतल्याबद्दल पक्षश्रेष्ठीचे धन्यवाद मानले आणि त्यांनी मांडलेल्या मुद्यावर मुंबईसह मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र कोकण, उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजाचे नेत्यानी जो पाठिंबा दिला त्या बद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानत प्रचार कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.