सध्याच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टीचा अभाव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
देशाची सत्ता तुमच्या हातात आहे. त्या सत्तेचा वापर कसा केला, आणि देशाचं चित्र बदलण्यासाठी तुम्ही काय केलं हे सांगण्याऐवजी
अमरावती दि. २२ एप्रिल: देशाची सत्ता तुमच्या हातात आहे. त्या सत्तेचा वापर कसा केला, आणि देशाचं चित्र बदलण्यासाठी तुम्ही काय केलं हे सांगण्याऐवजी अन्य लोकांवर टीका केली पाहिजे, याचा अर्थ आजच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टीचा अभाव आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी केला आहे.
महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बळवंतराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेतून शरद पवार साहेब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की, देशाची सत्ता मोदींच्या हाती आहे. गेली दहा वर्ष आपण पाहत आहोत. अनेक ठिकाणची त्यांची भाषण ऐकत आहोत. मी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेत गेल्या ५६ वर्षपासुन आहे. संसदेत अशी एकही व्यक्ती नाही की एकाही दिवसाचा गॅप न घेता सतत निवडून येतो. या ५६ वर्षात अनेकांना मी जवळून पाहिलं. लांबून पाहिलं. इंदिरा गांधींना पाहिलं. राजीव गांधींचं कामकाज पाहिलं. नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्यासोबत काम केलं. जे जे पंतप्रधान झाले, नेहरू नंतरचे त्या सर्वांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जायचं भाषणं करायचं आणि नवा भारत कसा उभा राहील लोकांचा आत्मविश्वास कसा वाढेल याचं काम ते करायचे. आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा नेहरूंवर टीका करतात असे शरद पवार साहेब म्हणाले.
पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, ज्या नेहरुंनी स्वातंत्र्याच्या पूर्व काळात आयुष्याची उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुरुंगात घालवली. स्वातंत्र्यानंतर देश संसदीय पद्दतीने चालला पाहिजे. त्यासाठी रचना उभी केली. त्या नेहरूंचं योगदान देशाच्या इतिहासातून पुसून काढू शकत नाही. पण आजचे पंतप्रधान हे नेहरूंवर टीका करतात. त्यांच्या चुका शोधतात. पण दहा वर्षात मी काय केलं हे सांगत नाही. तुमच्या हातात सत्ता आहे. त्या सत्तेचा वापर कसा केला, आणि देशाचं चित्र बदलण्यासाठी तुम्ही काय केलं हे सांगण्याऐवजी अन्य लोकांवर टीका केली पाहिजे, याचा अर्थ आजच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यामुळे त्यांच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे असेही शरद पवार साहेब म्हणाले.
यावर सविस्तर बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी येतात. सर्व पक्षाचे सदस्य येतात. गप्पा मारतात. तिथे पक्षीय अंतर कोणी आणत नाही. पण आम्ही पाहतो मोदी तिथून जात असल्यावर सत्ताधारी खासदार मान खाली घालतात. मोदींना दिसू नये म्हणून. इतकी दहशत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सत्ता द्यायची का? असे शरद पवार साहेब म्हणाले.
शरद पवार साहेब म्हणाले की, भाजपाकडे दर मंगळवारी बैठक असते. तिथे चर्चा होत नाही. कुणीही बोलत नाही. फक्त तिथे मोदी बोलतात आणि निघून जातात. कुणालाही बोलता येत नाही. आज देशात मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होतो की काय ही चिंता आहे असेही शरद पवार साहेब बोलताना म्हणाले.
शरद पवार साहेब म्हणाले की, संसदीय लोकशाही संकटात जाईल असं लोक म्हणत आहे. केंद्र सरकारच्या मंत्र्याने बंगलोरमध्ये भाषण केलं. मोदींना ज्या पद्धतीने देश चालवायाचा आहे. त्यासाठी घटना बदलायला पाहिजे. भाजपचा खासदार जाहीरपणे म्हणतो, घटना बदलयाची आहे. मोदींना सत्ता द्या. उत्तर प्रदेशातही तेच सांगितलं जातं, मोदींचे हात बळकट करायचे असेल तर संविधान बदललं पाहिजे. बाबासाहेबांनी मोठं योगदान दिलं ते म्हणजे संविधान. आजबाजूचे देश पाहा. पाकिस्तानमध्ये लष्करशाही होती. श्रीलंकेत लष्करशाही, नेपाळमध्ये हुकूमशाही आणि चीनमध्ये हुकूमशाही आहे. त्यामुळे देशाचं संविधान वाचवलं पाहिजे. त्यासाठी आपण लढलं पाहिजे. एकत्र आलं पाहिजे असेही शरद पवार साहेब म्हणाले.
शरद पवार साहेब म्हणाले की, गेले काही दिवस उद्धव ठाकरे मी स्वत: आमचे आघाडीचे सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपली भूमिका मांडत आहेत. जे काही संकट देशावर दिसत आहे, त्यातून कशी मुक्तता होईल याचा विचार मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या ठिकाणी आल्यावर मला अनेक जुन्या गोष्टी आठवतात. सार्वजनिक जीवनात कामाला सुरुवात केल्यानंतर मी तरुणांच्या चळवळीत सहभागी झालो. महाराष्ट्रभर फिरलो. पण अमरावती असं ठिकाण होतं तिथून तरुणांची एक शक्ती उभी राहिली आणि आम्हा सर्वांना काम करण्यासाठी अमरावतीकरांनी प्रोत्साहन दिलं असे शरद पवार साहेब म्हणाले.
शरद पवार साहेब म्हणाले की, आज या ठिकाणी मी आलोय ती एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला, खासदार केलं. पण गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. कधी तरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे. ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सार्वजिनक आणि व्यक्तिगत जीवन स्वच्छ आहे. अशा बळवंतराव वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे असे शरद पवार साहेब म्हणाले.