लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज
भारत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेच्या चार मतदारसंघांचा समावेश आहे
लोकसभेच्या चार मतदारसंघांचा समावेश
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ, उपजिल्हाधिकारी शारदा पवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २६-मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर- पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व, २९- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभेच्या २६ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी अणुशक्तीनगर आणि चेंबूरचा समावेश लगतच्या मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात आहे.
२६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना
मुंबई उपनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या चार मतदारसंघांसाठी २० मे २०२४ रोजी मतदान होईल. त्यासाठी २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. ३ मे २०२४ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ४ मे २०२४ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ६ मे २०२४ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर २० मे २०२४ रोजी मतदान होऊन ४ जून २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.
७२ लाख २८ हजार मतदार
मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ७२ लाख २८ हजार ४०३ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या ३८ लाख ९४ हजार १८०, महिला मतदारांची संख्या ३३ लाख ३३ हजार ४२२ एवढी आहे. तृतीय पंथी मतदारांची संख्या ८०० एवढी आहे, तर परदेशी मतदारांची संख्या १६४४ एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या १४ हजार ११३ आहे. सर्व्हिस मतदारांची संख्या एक हजार ६६ एवढी आहे. ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १ लाख १ हजार ६७३ एवढी आहे. लोकसभेच्या या चारही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या सात हजार ३५३ एवढी आहे. त्यात २७ सहाय्यक मतदान केंद्रे असतील.