लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रदेश काँग्रेसची मुंबई वगळून २० लोकसभा मतदारसंघाची चर्चा – नाना पटोले
लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून काँग्रेस पक्षाने आज मुंबई वगळता राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून काँग्रेस पक्षाने आज मुंबई वगळता राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उमेदवार देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल व त्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित केले जाईल. काँग्रेसच्या पक्षाच्या संभाव्य जागांवरील स्थानिक पदाधिकारी यांचे मते व राजकीय परिस्थिती याची चर्चा करण्यात आली. मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा संकल्प केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई वगळता राज्यातील २० मतदारसंघाबाबत चर्चा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गोवा, दिव, दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर, आ. अमित देशमुख, आ. विश्वजीत कदम, कार्याध्यक्ष नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे सर्व जिल्हाध्यक्ष, माजी खासदार, आमदार, जिल्हा प्रभारी, सर्व विभागप्रमुख, जिल्ह्यातील आघाडी व संघटनांचे प्रमुख आदी उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षात लोकशाही पद्धतीने कामकाज चालते त्यासाठी सर्वांची मते विचारात घेतली जातात. संभाव्य उमेदवारांच्या नावावरही चर्चा करून त्यानंतरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. सांगली व कोल्हापूरची जागा काँग्रेस पक्षाची आहे. तिथून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून लढणार आहेत. सांगलीही काँग्रेसच लढणार आहे. उत्तर मध्य मुंबई मधूनही निवडणुक लढवण्यास अनेकजण इच्छुक आहेत. दिल्लीतून थेट उमेदवार जाहीर करायचे व त्यानंतर उमेदवारांनी उमेदवारी नाकारायची अशी पद्धत काँग्रेसमध्ये नाही. आजच्या बैठकीनंतर उद्या ६ तारखेला महाविकास आघाडीची बैठक होत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व वंचितचे प्रकाश आंबेडकर हे या बैठकीत उपस्थित असतील असे पटोले यांनी सांगितले.
अमित शाह यांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घराणेशाहीवर टीका केल्याच्या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, अमित शाह यांचा मुलगा कोणते क्रिकेट खेळला की बीसीसीआयचा सचिव केला आहे. दुसऱ्याकडे एक बोट केले की चार बोटे आपल्याकडे असतात हे लक्षात ठेवावे. अमित शाह यांना घराणेशाहीवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर भाजपाकडूनच अन्याय…
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव आहे परंतु भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव मात्र नाही. २०१९ साली पंतप्रधानपाने उमेदवार अशी गडकरी यांची चर्चा होती. भाजपाने पहिल्या यादीत गडकरींची उमेदवारी जाहीर न करून त्यांच्यावर अन्याय केला आहे, असे पटोले म्हणाले.
भाजपा नाही आता ‘मोदी परिवार’…
नरेंद्र मोदी यांना ज्या भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री केले, पंतप्रधान केले तो पक्ष आता मोदी परिवार झाला आहे. भाजपाच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरून भाजपा नाहीतर ‘मोदी परिवार’च दिसत आहे. असा टोलाही पटोले यांनी लगावला.