महाराष्ट्रमुंबई

लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी

शाच्‍या विकासात आता चंद्रपूर महत्‍वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्‍य करार केले गेले आहेत

देशाच्‍या विकासात आता चंद्रपूर महत्‍वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्‍य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्‍यांच्‍या पाठीशी पूर्ण उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्‍या विकासातही हातभार लावेल, असे प्रतिपादन वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘देश के निर्माण में चंद्रपूर मैदान में’ असे सांगून देशविकासाच्या कार्यात चंद्रपूर महत्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर व असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे सोमवारी वन अकादमी येथे उद्घाटन झाले.

त्यावेळी मंत्री श्री मुनगंटीवार बोलत होते. कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्‍यासह आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी विनय गौडा, सीईओ विवेक जॉन्‍सन, मनपा आयुक्‍त विपीन पालिवाल न्‍यू ईरा व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडे, लॉईडचे मधूर गुप्‍ता, कुमार वार, राकेश प्रसाद, राजेश झंझाड, जी. डी. कामडे, आलोक मेहता, के. जी. खुबाटा, मधुसूदन रुंगटा उपस्‍थ‍ित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर हे आतापर्यंत कोळसा, सिमेंट यासाठी ओळखले जात होते. येथे स्‍थापन झालेले उदयोग भविष्‍यात अधिक प्रगती करतील. त्याचा लाभ स्थानिक परिसराला होईल. करार झालेल्‍या कंपन्‍यांच्‍या विविध परवानगींसाठी ‘वन विंडो सिस्‍टीम’ तयार करण्‍यासोबतच एअरपोर्ट, रेल्‍वे, रस्‍ते आदी पायाभूत सुविधा, कौशल्‍य विकासाचे विविध अभ्‍यासक्रम, संशोधन कार्यक्रमांवर भर दिला जाणार असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले.

मंत्री श्री. लोढा यांनी श्री. मुनगंटीवार यांच्‍या कार्याचे कौतुक केले. आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी शुभेच्‍छा दिल्‍या.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्‍सन यांनी अॅडव्‍हांटेज विदर्भ व चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी जिल्‍हा प्रशासनाने विविध कंपन्‍यांशी केलेल्‍या सामंजस्‍य करारासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या सामाजिक, औद्योगिक व आर्थिक विकासाबद्दल विस्‍तृत सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभेच्छा संदेश दाखवण्यात आले. ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 संदर्भात एक चित्रफीत दाखवण्यात आली.

ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 साठी राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि केंद्र शासनाच्या एमएसएमई मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व श्‍यामल देशमुख यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button