महाराष्ट्रमुंबई

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड: नाना पटोले

मुंबई ते नागपूर ७०० किलोमिटरच्या समृद्धी महामार्गाचा शिंदे-फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा केला, जाहिरातबाजी करुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनही केले. १२ तासात मुंबईहून नागपूरला पोहचणार असा दावा करणाऱ्या महामार्गाचेच १२ वाजले आहेत.

मुंबई ते नागपूर ७०० किलोमिटरच्या समृद्धी महामार्गाचा शिंदे-फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा केला, जाहिरातबाजी करुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनही केले. १२ तासात मुंबईहून नागपूरला पोहचणार असा दावा करणाऱ्या महामार्गाचेच १२ वाजले आहेत. समृद्धी महामार्ग पहिल्यापासूनच वादग्रस्त ठरला आहे. सातत्याने होत असलेल्या अपघाताचा प्रश्न असताना आता या महामार्गावरील एका पुलाला मोठा खड्डा पडला आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह तर निर्माण झाले आहे. पुलावर पडलेला हा केवळ खड्डा नसून ‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे पडलेले हे भगदाड आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील लोहोगावजवळच्या पुलाला खड्डा पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अवघ्या १४ महिन्यातच पुलावर भला मोठा खड्डा पडल्याने या रस्त्याच्या बांधकामाचा दर्जा चांगला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. समृद्धी महामार्गाच्या आराखड्यात व बांधकामात त्रुटी असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. नागपूर-मुंबई समृद्धी हा ५५ हजार कोटी रुपयांचा महामार्ग सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. महामार्गासाठी जमीन संपादन करताना मोठा भ्रष्टाचार झाला तसेच या महामार्गाच्या तांत्रिक बाबीमध्येही गडबड आहे. समृद्धी महामार्गाच्या आराखड्यासाठी तज्ञांच्या विशेष पथकाला हजारो कोटी रुपये दिले पण अपघाताचे प्रमाण पाहता रस्ते बांधणी करताना फारशी काळजी घेतल्याचे दिसत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि एक्स्प्रेस वे साठी साठी निश्चित केलेले नियम पाळलेले नाहीत. रोड हिप्नॅासीसमुळे अपघात होतात असे काही काही तज्ञांनी सांगितले आहे त्यावर काही उपाय केलेले नाहीत. रस्त्यावर ठरावीक अंतरावर चहापाणी, हॅाटेल आणि स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. त्यात आता रस्त्याला भगदाड पडल्याने या महार्गाने कोणाची समृद्धी केली हे दिसत आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button