बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

नवजात अर्भकाला वाचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा भातखळकारांकडून गौरव

मुंबई :

मालाड पूर्वला जितेंद्र रस्त्यावरील नाल्यात टाकून दिलेल्या एका नवजात अर्भकाला बाहेर काढून तिचा जीव वाचवण्यासाठी योगदान दिल्याबदल जीवदया अभियान मालाड फौंडेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी गौरव केला. या फौंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानामुळे एका नवजात अर्भकाचे जीव वाचल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. मालाड पूर्वमधील देवचंदनगर जैन संघाच्या सभागृहात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी जैन मुनी भगवंत जी यांच्यासह संघाचे ट्रस्टी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, जीवदया फौंडेशनसारखी सामाजिक संस्था माझ्या विधानसभा मतदारसंघात आहे, याचा मला अभिमान वाटतो. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केलेले कार्य अत्यंत गौरवास्पद आणि पुण्याईचे आहे. कार्यकर्त्यांनी जी तत्परता दाखवली त्यामुळे आज त्या नवजात शिशुचे प्राण वाचले आहेत. त्या बाळाच्या संगोपनासाठी सुद्धा या संस्थेने पुढाकार घेतला आहे. या बाळाच्या संगोपनासाठी आणि तिच्या भविष्यासाठी जी मदत लागेल ती सर्वतोपरी आपण करू. आजही आपल्या समाजात मुलगी जन्माला आली म्हणून तिला नाकारण्याची मानसिकता आहे, ही बाब अत्यंत क्लेशकारक आहे. या कृत्याबद्दलचा शोध पोलीस घेतीलच. पण भविष्यात मुलगी आहे म्हणून तिला नाकारण्याची जी मानसिकता आहे त्यातून समाज कसा बाहेर पडेल, यासाठी सुद्धा सर्वानीच काम करण्याची आवश्यकता आहे, असेही आमदार भातखळकर म्हणाले. यावेळी आमदार भातखळकर यांच्या हस्ते फौंडेशनचे अश्विन संघवी, समीर शहा, देव शहा, दर्शित शहा या कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

दि. २७ जानेवारी रोजी हे नवजात शिशु जितेंद्र रस्त्यावरील एका नाल्यात आढळून आले. एका मुलाला नाल्यामधून आवाज ऐकू आल्यानंतर त्याने जीवदया अभियान मालाड फौंडेशनच्या कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नाल्यातून उतरून संबंधित प्लास्टिक बॅग उघडून पहिली तर त्यात एक नवजात अर्भक असल्याचे आढळून आले. तिची नाळसुद्धा तशीच होती. या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून तिला म. वा. देसाई रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. नऊ दिवसांच्या उपचारानंतर त्या बाळाची प्रकृती उत्तम असून अंधेरीच्या एका स्वयंसेवी संस्थेकडे तिला पुढील संगोपनासाठी पाठवण्यात आले आहे. या कामाची दखल घेऊन कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button