विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत
राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश
मुंबई,
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत. यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.
राजभवन येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्यपाल यांचे सचिव श्वेता सिंघल, विशेष सचिव श्री. सक्सेना, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर अवर सचिव विकास कुलकर्णी यांच्यासह सर्व विद्यापीठाचे कुलगुरू, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, महाविद्यालयांनी एकत्रित येऊन क्लस्टर युनिव्हर्सिटी बनविण्याचा प्रयत्न करावा. तसेच विद्यापीठांनी ऑलिम्पिक विजेते खेळाडू तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासन अग्रेसर आहे. प्रत्येक कुलगुरूंनी विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर अहवाल पाठवावा. कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर देऊन रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे.
उच्च शिक्षणामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. एनआयआरएफ (NIRF) रैंकिंगमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये, विद्यापीठाचा समावेश वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केली.