अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचा मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप
लोकशाही संस्थांवरील विश्वास अधिक बळकट करण्यासाठी परिषद उपयुक्त ठरेल - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
मुंबई
विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधींना परस्पर संवादी चर्चेसाठी सकारात्मक वातावरण राखणे आणि चर्चा, संवादांना प्रोत्साहन देऊन लोकहितासाठी सकारात्मक निर्णय घेणे ही पीठासीन अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी समाजाच्या प्रति लोकप्रतिनिधींनी कटिबद्ध असणे महत्वाचे आहे. लोकशाही स्तंभांचे रक्षण करण्याची महत्वाची जबाबदारी पीठासीन अधिकारी यांची असते. लोकशाही संस्थांवरील लोकांचा विश्वास बळकट करण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
विधान भवन येथे आयोजित दोन दिवसीय 84 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप प्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बोलत होते यावेळी राज्यपाल रमेश बैस, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणाले की, लोकशाहीचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी देशाच्या अमृत काळात विकसित भारत@2047 या संकल्पने निमित्ताने पाच ठराव करण्यात आले असून यामध्ये विधीमंडळाचे प्रभावी कामकाज करणे, तळागाळातील पंचायतराज संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता वाढविणे, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रोत्साहन देणे, कार्यकारणीच्या उत्तरदायित्वाची अंमलबजावणी करण्यासाठी परिणामकारकता आणि सुधारणा करणे, ‘एक राष्ट्र एक विधानमंच’ असे महत्वपूर्ण ठराव करण्यात आले आहेत. या सर्व ठरावांची अंमलबजावणी, भविष्यात नक्कीच परिणामकारक होईल. असा विश्वास उपराष्ट्रपती यांनी यावेळी व्यक्त केला.
विधिमंडळातील शिस्त आणि गैरवर्तन हा लोकांच्या चिंतेचा विषय आहे. विधिमंडळांमध्ये अशोभनीय वर्तनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत हे दुर्दैवी आहे. सभागृहात गोंधळ घालण्याची वृत्ती वाढत चालली आहे. लोकप्रतिनिधी जर विधिमंडळामध्ये शिष्टाचार, शिस्तीचे पालन करत नसतील तर कुठे तरी या वृत्तीला शिस्त लावलीच पाहिजे. सभागृहात होणारी चर्चा ही लोकहितासाठी असली पाहिजे, अलीकडील काळात सभागृहात हे प्रमाण कमी होत अजून हे लोकशाहीला मारक आहे. विधिमंडळप्रक्रिया अर्थपूर्ण, उत्तरदायी, प्रभावी, पारदर्शक,आणि लोकांच्या हितासाठी राबविली जाते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अत्यंत महत्वाचे बदल लोकसभा कामकाजात केले आहेत. असेही उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी यावेळी सांगीतले.