बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभासाठी २ लाखापेक्षा जास्त खेळाडू सज्ज

सहभाग घेण्यासाठी युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई,

राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ’ स्पर्धा येत्या २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई शहरात आणि उपनगरात प्रथमच देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. या स्पर्धेचे उ‌द्घाटन दि. २६ जानेवारी २०२४ रोजी वरळीतील जांभोरी मैदान येथे होणार आहे.

सव्वादोन लाख खेळाडूंची नोंदणी
छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभात लगोरी, लेझिम, लंगडी, पंजा लढवणे, दोरीच्या उडया, रस्सीखेच, फुगडी, मल्लखांब, कबड्डी, मानवी मनोरे, आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, खो-खो, विटीदांडू, शरीर शौष्ठव, ढोलताशा या १६ पारंपारिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सव्वादोन लाख खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या स्पर्धा विविध वजनी गटात व वयोगटात घेण्यात येणार आहेत. आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, शरीर शौष्ठव व ढोलताशा है चार खेळ अंतिम स्तरावर एकाच ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत.

२७ गडकिल्ल्यांचे प्रदर्शन
शिवकालीन खेळ स्पर्धेच्या अनुषंगाने उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्रातील २७ किल्ल्यांचे प्रदर्शन उभारले जाणार असून, उपस्थित नागरिकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून या किल्ल्यांची माहिती दिली जाणार आहे. त्याचसोबत दांडपट्टा, लाठीकाठी या सारख्या शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके सुद्धा उद्घाटन प्रसंगी सादर केली जाणार आहेत.

रायगडावरून होणार शिवज्योतीचे आगमन
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सदर स्पर्धेचे आयोजन केले जात असून, स्पर्धेचे पावित्र्य जपण्यासाठी रायगडावरून शिवज्योतिचे मुंबईमध्ये आगमन होणार आहे.

स्पर्धेसाठी मुंबई शहरातील आणि उपनगरातील मैदाने सज्ज

हा क्रीडा महोत्सव मुंबई उपनगरात अंधेरी, बोरीवली, कुर्ला, मुलुंड या चार तालुक्यांमध्ये तसेच मुंबई शहरात दोन ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. मल्लखांब, कबड्डी व खो-खो या खेळ प्रकारांच्या तालुकास्तरीय स्पर्धा उपनगर व शहर प्रत्येकी एक ठिकाणी आयोजित करून अंतिमस्तराचे सामने एका ठिकाणी होणार आहेत. इतर ९ खेळांच्या तालुकास्तरीय स्पर्धा ६ ठिकाणी होणार असून अंतिम स्पर्धा मध्यवर्ती एकाच ठिकाणी घेण्यात येणार आहेत अशा प्रकारे एकूण २० मैदान/सभागृहात सदर स्पर्धा योजिले आहेत. त्यातील अंतिम स्पर्धा हया १० मैदान आणि सभागृहात होणार आहेत. मंत्री लोढा यांनी स्पर्धेत कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी तयारीमध्ये स्वतः लक्ष घालून काम पूर्ण करून घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button