कांदिवली पूर्वे विधानसभेत रंगला प्राणप्रतिष्ठा सोहळा
ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, आमदार अतुल भातखळकर यांचा पुढाकार
मुंबई :
प्रभू राम जन्मभूमी अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात सोमवारी ठिकठिकाणी विविध धार्मिक, सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडले. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी प्रभू रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. मतदारसंघातील सर्व मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांनी दिवे प्रज्वलित करून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून अक्षरशः दिवाळी आजारी केली. मतदारसंघात पार पडलेल्या सर्व कार्यक्रमांत आमदार भातखळकर सहभागी झाले होते.
कांदिवली पूर्व येथील आकुर्ली माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो रामभक्त मंदिरात एकत्र आले होते. आमदार भातखळकर यांनी या सर्व रामभक्तांच्या सानिध्यात प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहिला. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शेजारीच आमदार भातखळकर यांच्या आमदार निधीतून निर्माण करण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आले. उपस्थित सर्व रामभक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. लोखंडवाला परिसरात सायंकाळी दिवे प्रज्वलित करण्यात आले. महाआरती करण्यात आली. मालाड पूर्वला ठीकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. विविध मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, आरास करण्यात आली होती. युवकांनी मोटारसायकल रॅली काढली होती. ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’ च्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.
कांदिवली पूर्व विधानसभेत दुपारी तसेच सायंकाळीसुद्धा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो रामभक्तांनी याचा लाभ घेतला. रस्तोरस्ती रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी प्रभू श्रीरामाचे फ्लेक्स, झेंडे झळकत होते. एकंदरीत परिसर हा राममय झाला होता. प्रत्येक नागरिकाने या उत्सवात आनंदाने सहभाग घेतला.