बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रावर विश्वास असल्याने विविध देश राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर,

केंद्र शासन गोरगरिबांसाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रे नगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प होय. या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरिबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे, असे भावोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या 30 हजार घरकुलांपैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, खा. रणजितसिंह निंबाळकर, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी तसेच रे नगर हाऊसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, जागतिकस्तरावर भारताचे महत्त्व वाढत असून त्यात छोट्या उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे. विकसित भारत होण्यास आत्मनिर्भर भारत बनणे गरजेचे आहे. त्यासाठी सूक्ष्म, लघु व कुटीर उद्योगांची भूमिका मोठी आहे. अशा उद्योगांना केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. त्यातून मेड इन इंडिया उत्पादकांसाठी मोठ्या आशा वाढल्या आहेत. अशा प्रयत्नातूनच आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील अग्रक्रमांकाच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

केंद्र शासनाने गरिबांना सर्वोच्च प्राधान्य देऊन विविध योजना राबवल्या. त्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना देऊन मध्यस्थांची साखळी बंद केली. गेल्या 10 वर्षात 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांच्या खात्यावर थेट पाठविले. जनधन योजना, आधार आदीद्वारे 10 कोटी बनावट लाभार्थ्यांना हटविण्याचे काम केले. याशिवाय गरिबांना साधन, संसाधने उपलब्ध करून दिल्यास ते गरिबीचा पराभव करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे लक्षात घेऊन मागील 9 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी राबविलेल्या अनेक योजनांमुळे 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आल्याचे ते म्हणाले.

हे शासन गरिबांसाठी समर्पित होते असे 2014 मध्ये घोषित केले होते. त्यानुसार गरिबांच्या समस्या कमी होण्यासह त्यांचे जीवन सुलभ व्हावे म्हणून अनेक योजना राबविल्या. संपूर्ण देशात 4 कोटी लोकांना पक्की घरे 10 कोटी शौचालये, देऊन त्यांचा आत्मसन्मान वाढविण्याचे काम केले. देशातील गोरगरिबांना मोफत अन्नधान्य योजना कोरोना काळापासून लागू केलेली होती. त्या योजनेला पुढील पाच वर्षे मुदतवाढ दिलेली आहे. ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना राबवल्यामुळे देशभरात कोठेही गेल्यास संबंधित गरीब कुटुंबाला मोफत अन्नधान्य मिळण्याची सोय केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्यावरील उपचारासाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, जन औषधी केंद्राद्वारे 80 टक्के पर्यंत सवलतीच्या दराने औषधे, हर घर जल योजना, शौचालय आदी सामाजिक न्यायाच्या योजना आहेत. संत रविदास, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले सामाजिक न्यायाचे स्वप्न याद्वारे पूर्ण केले जात आहे.

सोलापूर शहर हे व्यापारी उद्योगांचे शहर असून येथील कापड व चादर उद्योग देशभरात प्रसिद्ध आहे. इथे कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचा लाभ येथील कामगारांनी घ्यावा असे आवाहनही प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी केले. संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, संत तुकाराम पालखी मार्ग तसेच विविध महामार्गाचे जाळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण होत असून त्यातून विकासाची गती वाढणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button