जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर..!!
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका
मुंबई
मुख्यमंत्रीपदासाठी “महा”कपट, “महा”धोका केला नसता; अडीच वर्षे..असं काही ठरलं नसताना ही “महा”खोटं बोलला नसता;रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या “महा” शकुनीला आवरले असते तर अशी “महा” पत्रकार परिषद घेण्याची, नौटंकीची वेळ आली नसती…जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर… अश्या म्हणत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले,
दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि “महा” कपटामुळेच “महा”भारताचे युध्द झाले. म्हणून पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा “महा”नाश झाला. नेहमी एक खोटं लपवण्यासाठी “महा” खोटे बोलावे लागते. चिलीम आणि गांजा ओढल्यावर ज्याला जे पाहिजे तो ते बोलू शकतो. त्यांच्याकडे सर्टिफिकेटचा काही पुरावा आहे का ? आपण काय बोलतो त्याचा पुरावा आहे का? रोज तोंडावर पडणारी ही महानाटकी लोक आहेत. संजय राऊत यांचे महाप्रमुख आहेत. त्याचे कारण आहे की, आजपर्यंत हे दहा वेळा म्हंटले सरकार पडेल, २५ वेळा म्हटले आमदार अपात्र होतील, पन्नास वेळा म्हणाले सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात आम्हाला दिलासा मिळाला आहे. १०० वेळा म्हणाले, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आमच्या बाजूने आहे पण प्रत्यक्षात खरे काय निघाले. हे महाखोटे बोलणारे महानाट्याचे प्रमुख संजय राऊत हजार वेळा तोंडावर महाआपटले गेले. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याला काही अर्थ नाही.
महायुतीतील सर्व सहा जागा जिंकू
महायुतीतील सर्व सहा जागा जिंकून आणण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे. आम्ही त्याचा आढावा घेऊन योजना बांधत आहोत. नियोजन करत आहोत. बूथ स्तरावर गट स्तरावर, समाज वर्ग स्तरावर, भाषावर वर्ग स्तरावर त्याबद्दलची योजना आणि आखणी करत आहोत. तीन लोकसभेचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या तीन लोकसभांचे काम आज पूर्ण झालेले आहे. सहाही लोकसभा आम्ही जिंकू असा आशावाद आ. ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्यासारखा अहंकारी नेता झाला नाही…
जो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेला त्यांची वाताहत करण्याचे काम उबाठा गटाने केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा अहंकारी नेता या राज्यांमध्ये कधी न झाला ना कधी होईल. ज्यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरा कुठलाही विचार सुचत नाही. अगदी मित्र पक्षाचाही विचार सुचत नाही. याचा अनुभव आम्ही घेतला आहे.आता काँग्रेसला तो फटका बसत आहे. याबद्दल मिलिंद देवरा यांनी वाच्यता केली आहे. आता उरल्या-सुरल्या काँग्रेसची धूळधाण उद्धव ठाकरे करतील हे महाराष्ट्र बघेल असेही आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.
त्यांच्यावर राजकीयदृष्ट्या हे राम म्हणण्याची वेळ..
ज्यांना राजकीयदृष्ट्या हे राम म्हणण्याची वेळ आली आहे त्यांच्या आवाजात न बळ आहे ना त्यात तथ्य आहे. भगवान रामाबद्दल जेवढा अपमान संजय राऊत यांनी केला तेवढा अपमान आयएसआय संघटनेच्या लोकांनी केला की, नाही हा प्रश्न आहे. राम वर्गणीच्या बाबतीत संजय राऊत यांनी कुचेष्टा केली. राम मंदिराच्या जागेबाबत वाद निर्माण केला. रामसेतूवर प्रश्न करणाऱ्यांबरोबर सलगी केली. राम भक्तांवर गोळ्या मारणाऱ्याबरोबर हात मिळवणी केली. राम भक्ताच्या खुनाचे रक्त संजय राऊत यांच्या पक्षाच्या हाताला लागले आहे. आता भगवान रामाला एका पक्षामध्ये बांधण्याचे काम तेच करत आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांना हे राम म्हणण्याची वेळ आली आहे. संजय राऊत यांच्या पत्रकारितेची डिग्री तपासली पाहिजे. महापापी कोटा माणूस संपादक कसा असू शकतो त्यामुळे त्यांची डिग्री पहिली तपासली पाहिजे असेही आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.
महाविकास आघाडीच्या काळातील उठाठेवींची सफाई सुरू आहे
फिल्मफेअरचे कार्यक्रम देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. ती काही सरकारी योजना नाही. सरकार त्यावर जीआर काढून नियम करते अशी भूमिका नाही. त्यासाठी सबसिडी सरकार देत नाही. त्यांच्या सोयीने हा एका वर्तमानपत्राच्या विभागाचा विषय आहे. त्यामुळे त्या वर्तमानपत्राच्या मालकाला ते विचारा. वडेट्टीवार यांनी अडीच वर्षांमध्ये त्यांचे सरकार असताना जे काही वाढून ठेवले आहे त्यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर त्यांनी कधीतरी भाष्य करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणी बोलत असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे असेही आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.