बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल

भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १३ : –

भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेले सृजनशील, अलौकीक प्रतिभा यांचे अनोखे वरदान म्हणता येईल, अशी एक तेजस्वी गानप्रभा आज निमाली आहे, अशा शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भारतीय संगीत क्षेत्राचे क्षितीज उजळवून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा समावेश करावा लागेल. शास्त्रीय संगीतातील त्यांचे योगदान उच्चकोटीचे आहे. संगीतातील विविध प्रवाहांना सामावून घेऊन, हे क्षेत्र त्यांनी समृद्ध केले. आपल्या अलौकिक प्रतिभेने त्यांनी गायनातील मानदंड प्रस्थापित केले. त्यांचे गाणे स्वर्गीय आणि मंत्रमुग्ध करणारे होतेच. पण आपल्या संगीत क्षेत्राचे देखणेपण आणि नजाकत प्रकट करणारे होते. त्यांनी भारतीय संगीताचे हे रुप आपल्या प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्वातून देश-विदेशातही पोहचवले. आपल्या प्रसन्न, वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरांनी त्या अजरामरच आहेत. आवाजाच्या रुपात त्या आपल्या अवतीभवतीच राहतील. पण संगीत क्षेत्राला मात्र त्यांची निश्चितच पोकळी जाणवेल. ही भारतीय संगीत क्षेत्राची आणि रसिकांसाठी मोठी हानी आहे. भारतीय संगीतामध्ये होणारे विविध बदल सहजपणे आत्मसात करीत संगीत क्षितिजावर अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्वरयोगिनीच्या रुपातील एक तेजस्वी तारा निखळला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान डॉ. अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत असे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button