३९३ कुपोषित बालके, २४ हजार मातांचे पोषण थांबले
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अन्य घटकांवरही परिणाम*
सरकार इतके असंवेदनशील कसे? जयंत पाटील यांचा सवाल*
सांगली
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्यामुळे १ लाख ३४ हजार बालकांचा नियमित आहार थांबला आहे. त्यामध्ये असलेल्या ३९३ कुपोषित बालकांनाही याचा फटका बसला आहे. तसेच ११ हजार ६३८ गर्भवती आणि १२ हजार ८५४ स्तनदा मातांचा आहारही थांबला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.
आपल्या एक्स हँडलवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले आहेत की, महिन्याभरापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्याने लाखो बालक व महिलांच्या पोषण आहारावर परिणाम झाला आहे. सांगली जिल्ह्यातील ही आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यभरात परिस्थिती किती हाताबाहेर गेली असेल हा विचारही सुन्न करणारा आहे. सरकार इतके असंवेदनशील कसे?
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यासह समाजातील अन्य घटकांवरही वाईट परिणाम होत आहेत. प्रामुख्याने कुपोषित मुले, गरोदर महिला, स्तनदा मातांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बालकांवर-महिलांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास त्यास जबाबदार कोण? अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असा खडा सवाल त्यांनी केला आहे.
शासनाने यावर गांभीर्याने विचार करून तातडीने मार्ग काढला पाहिजे असेही आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.