साकीनाका पोलिसांनी नऊ कोटी रुपयांच्या कोकेनसह दोन परदेशी नागरिकांना केली अटक
पोटात लपवून नऊ कोटी रुपयांचे ड्रग्ज मुंबईत आणले होते
श्रीश उपाध्याय
मुंबई
मुंबईतील साकीनाका पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून 9 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले की, 6 जानेवारी रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास पोलिसांनी साकी विहार रोडवर एका नायजेरियन नागरिकाला संशयास्पद स्थितीत पाहिले. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता तो पळून जाऊ लागला. पोलीस पथकाने त्याला पकडून त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून 88 कॅप्सूल जप्त करण्यात आले ज्यात 880 ग्रॅम कोकेन होता. पोलिसांनी आरोपी डॅनियल नेमेक याला अटक करून चौकशी केली. चौकशीदरम्यान व्हेनेझुएलाचा नागरिक जोएल अलेजांद्रो वेरा रामोस याने त्याला कोकेन दिल्याचे उघड झाले. रामोस हा साकीनाका येथील ड्रीम रेसिडेन्सी हॉटेलमध्ये राहत असल्याचेही समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून रामोसला अटक केली. चौकशीत रामोसने सांगितले की, तो ड्रग्ज पोटात लपवून मुंबईत आणला होता. पोटात ड्रग्ज घेऊन रामोस ब्राझीलहून इथिओपियामार्गे मुंबईत आला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
वरील कार्रवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त भरतकुमार सूर्यवंशी, साकीनाका पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गबाजी चिमटे, पोलिस निरीक्षक योगेश शिंदे, पोलिस निरीक्षक संभाजी साबळे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नागरे, पंकज परदेशी, पोलिस हवालदार दीपक कदम, पोलिस सिपाही कैलास कोळेकर, अय्याज शेख, शैलेश कदम, परेश शिंगवाड आदींनी ही कारवाई केली.