बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात माजी विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे

मंत्री दीपक केसरकर

अभियानातील विजेत्या शाळांना मुख्यमंत्री भेट देणार

मुंबई,

 

राज्यात सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यातील सर्व शाळा सहभागी होत आहेत. याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन शाळांना मुख्यमंत्री स्वत: भेट देणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आपली शाळा – सुंदर शाळा ठरावी यासाठी या अभियानात माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचे उद्घाटन 5 डिसेंबर 2023 रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मंत्री श्री.केसरकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीप डांगे, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, सहसचिव इम्तियाज काझी, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पत्र लिहिले असून सुमारे दोन कोटी विद्यार्थी या पत्राचे आपल्या पालकांसमोर वाचन करणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक व्यवस्थेतून आलेल्या अनुभवांवर आधारित घोषवाक्य लिहून अपलोड केले जाणार आहे. यामधून प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्यांची निवड करून विजेत्यांना मुंबई येथे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी या अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. यासाठी शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. तर बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा, वर्ग अ आणि वर्ग ब च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा अशा तीन स्तरांवर हे अभियान राबविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button