उद्धव ठाकरे यांच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांची टीका
मुंबई
दिनांक २ जानेवारी २०२४
राम मंदिरासाठी ज्या कोठारी बंधूंनी स्वतःचे बलिदान दिले त्यांचा खून मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने केला. रामभक्त, कारसेवक कोठारी बंधूंच्या खुनाच्या रक्ताने ज्या समाजवादी पक्षाचे हात रंगले आहेत त्यांच्याशी हात मिळवणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे त्यांच्याही हाताला रामभक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचे रक्त लागले आहे, अशी खरमरीत टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
आ. ॲड. आशिष शेलार यांनी पक्षाच्या बैठकीबाबतीत माहिती देताना सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय कार्यक्रम चालू आहे. तीन लोकसभांसाठी एक नेता या प्रमाणे देशभर प्रवासाचा कार्यक्रम ठरला आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सर्वजण देशातील तीन ते चार लोकसभेचे एक क्लस्टर बनवून बैठका घेणार आहेत. त्या अगोदर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रत्येक लोकसभेच्या तीन विधानसभा यांच्या बैठका घेणार आहेत. त्याचा दौरा आता सुरू झाला आहे. जे विधानसभेतील प्रत्यक्ष निवडणुकीचे काम पाहणार आहेत या सुपर वॉरिअरची मुंबईतील बैठक घेतली जाणार आहे. संघटनेच्या तळागाळातील स्तरावर पोहोचणे हे त्यामागील उद्दिष्ट आहे. याच अनुषंगाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
पत्रकारांनी शरद पवार गटाच्या बैठकीबाबत विचारले असता ते म्हणाले, शरद पवार यांनी पहिल्यांदा स्पष्ट करावे की,त्यांच्या पक्षात किती आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आहेत. हा पक्ष आहे का, तो गट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना तो गट आहे या सत्यावर आता यावं लागेल.
उबाठाच्या दिल्ली दौऱ्यबाबतीत विचारले असता अँड शेलार म्हणाले की, उध्दव ठाकरे आमच्याबरोबर असताना आमच्याकडे या, बंगल्यावर या, अश्या पद्धतीचा अहंकार दाखवणारे आता सरपटत दिल्लीला चालले आहेत. त्यांना सरपटत दिल्लीला जाऊ दे, कुर्निसात घालून दे, महाराष्ट्र हे बघतो आहे. आज ठाकरेंचा शिवसेना गट स्वतःच्या जागा जिंकण्यासाठी मदत करण्याकरिता देशभर सरपटत आहे. आमच्याबरोबर ज्या वेळेला होते त्यावेळी ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भारतीय जनता पक्षाने टिकवला होता. स्वार्थासाठी आणि स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाकरिता, खुर्चीसाठी लोलुपता केवढी होते हे उद्धव ठाकरे यांनी आज दाखवले आहे अशीही टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.