डॉ.उत्तम पाचर्णे यांच्या निधनाने कला क्षेत्राचे नुकसान
मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई,
ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शिल्पकार डॉ. उत्तम पाचर्णे यांच्या निधनाने कला क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
मंत्री श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ” डॉ.उत्तम पाचर्णे यांच्या निधनाने ललित कला अकादमीसह महाराष्ट्रातील कला क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातून येऊन शिल्पकलेच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले होते. तब्बल 3 वेळेस ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गोवा येथील कला अकादमीचे ते सल्लागार समितीचे सदस्य होते. पु. ल. देशपांडे राज्य ललित कला अकादमीच्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वील्झर्लंड बेल्जियम, नेपाळ, इस्राईल अशा अनेक देशांमध्ये त्यांच्या शिल्पाचे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. डॉ. पाचर्णे यांची लहान-मोठी शिल्पे भारतात आणि परदेशात विविध ठिकाणी बसविण्यात आली आहेत. ज्यात झाशीतील व्हाइट टायगर रेजिमेंट (1980), स्वामी विवेकानंद पुतळा, मुंबई (1981), स्थायी बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धुळ्यातील पुतळा (2002), दक्षिण मुंबईतील राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा, (2003), अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील स्वतंत्र ज्योत (2004), छत्रपती संभाजी नगर येथील स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ (2007) यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाने आपण एका ज्येष्ठ शिल्पकराला मुकलो आहोत. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो अशी प्रार्थना करतो.”, असेही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.