जळगाव एमआयडीसीमधील उद्योजकांकडून दोन प्रकारचे कर घेतल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती
मंत्री उदय सामंत
नागपूर,
जळगाव एमआयडीसी मधील उद्योजकांकडून 2 प्रकारचे कर एमआयडीसी तसेच महानगरपालिका यांच्याकडून घेण्यात येत असल्याबाबत नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिव आणि उद्योग विभागाचे प्रधान सचिवांची तीन सदस्यीय समिती स्थापन करून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य सुरेश भोळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, जळगाव शहरातील एमआयडीसी लगत असलेल्या जागेमध्ये नवीन उद्योग यावेत, यासाठी स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच या एमआयडीसीमधील उद्योजकांकडून 2 प्रकारचे कर एमआयडीसी तसेच महानगरपालिका आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी सदस्य संजय सावकारे, जयकुमार गोरे, ॲड. आशिष जैस्वाल, राजू कारेमोरे, जयकुमार रावल, रईस शेख, डॉ. देवराव होळी, संजय गायकवाड, बच्चू कडू यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.