140 व्या चंपाषष्ठी पालखी जत्रोत्सवाचा प्रारंभ उत्साहात
कुर्ल्याची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाणारी श्री क्षेत्र सर्वेश्वर महादेव मंदिराच्या वतीने श्री सर्वेश्वर महादेव देवालय ट्रस्ट आयोजित 140 व्या चंपाषष्ठी पालखी जत्रोत्सवाचा प्रारंभ उत्साहात झाला. हजारों नागरिकांच्या उपस्थितीत भव्य पालखी यात्रा काढण्यात आली. सालाबाद प्रमाणे यावर्षी 140 वी श्री सर्वेश्वर चंपाषष्ठी पालखी मिरवणूक श्री सर्वेश्वर महादेव मंदिरातून प्रारंभ होऊन कुर्ला सर्वेश्वर मंदिर मार्ग, न्यू मिल रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक वाया चुनाभट्टीमध्ये गोरखनाथ मंडळ, बाळ गोपाळ मित्र मंडळ, शनेश्वर मंदिर चुनाभट्टीपर्यंत जाऊन परत श्री सर्वेश्वर मंदिरामध्ये आली. 30 डिसेंबर 2023 पर्यंत श्री रामाची जत्रा साजरी केली जाईल.
यावेळी चंद्रकांत न्हानू सावंत (अध्यक्ष), रविंद्र व्यंकट कोचळे (व्यवस्थापकीय विश्वस्त), प्रदीप तुकाराम भोसले (विश्वस्त), बबन शेळके ( विश्वस्त), आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, विभाग प्रमुख डॉ महेश पेडणेकर, मनोज नाथानी, डॉ अनुराधा पेडणेकर, किसन मदने, मनीष मोरजकर, मनीषा मोरजकर, बाळासाहेब गाढवे, उमेश गायकवाड, दिलीप सराटे, सत्यवान गवळी, प्रकाश चौधरी, चेतन कोरगावकर उपस्थित होते. 140 वर्षापूर्वी स्वदेशी मिलमधील कामगारांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी आपल्या पगारातून जमा केलेल्या वर्गणीतून टाटांकडून वाडिया मार्फत उपलब्ध करून दिलेल्या कुर्ला तकियावार्ड येथील जागेत श्री सर्वेश्वर महादेव मंदिराची स्थापना व उभारणी करून पहिला चंपाषष्ठी उत्सव बुधवार दि. 5 डिसेंबर 1883 रोजी साजरा करण्यात आला होता.