बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, 600 कोटींचा सामंजस्य करार

नागपूर,

राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्वाचा घटक बसस्थानक. या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ( MIDC) यांच्या दरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला

विधानभवन येथे झालेल्या या करारप्रसंगी उद्योग मंत्री तथा एमआयडीसीचे अध्यक्ष उदय सामंत, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटीया, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व एसटीचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील या 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभिकरण होणार आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या दरम्यान 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.

राज्यभरात एसटीची 609 बसस्थानके आहेत. त्यापैकी सध्या 563 बसस्थानके कार्यरत आहेत. बसस्थानक परिसरातील खड्डे , पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. एसटी बसेसचे देखील नुकसान होते. यावर कायमचा उपाय म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी एसटीच्या अमृतमहोत्सवी समारंभात केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात एमआयडीसी 193 एसटी बसस्थानकासाठी कॉक्रिटीकरण करण्यासाठी 500 कोटी रुपये व रंगरंगोटी ,किरकोळ दुरुस्ती करण्याची 100 कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबविणार आहे. यातून या सर्व बसस्थानकांचा कायापालट होणार आहे.

एमआयडीसीच्या या प्रतिसाद आणि पुढाकाराचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कौतुक केले. राज्यातील लोकाभिमुख सुविधा आणि अग्रेसर अशा उद्योग विभागाचे नवे सहकार्य पर्व सुरू होणार आहे. यातून एक वेगळे उदाहरण पुढे आल्याचेही, त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button