F.Y.B.Sc. (I.T.) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती मुंबई विद्यापीठाने मागविली
45 % कमी गुणांचे प्रकरण
मुंबई विद्यापीठाने 45 % कमी गुणांच्या प्रकरणाची दखल घेत F.Y.B.Sc. (I.T.) या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती मागविली आहे. महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी अंधेरी पूर्व येथील श्री राजस्थानी सेवा संघातर्फे संचालित महाविद्यालयातील 33 विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी न दिल्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कुलगुरू यांसकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुंबई विद्यापीठाशी संलग्नित/संचलित सर्व विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य/संस्थाचे संचालक, संचालक, उपपरिसर (ठाणे व रत्नागिरी) यांना मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ प्रसाद कारंडे यांनी कळविले आहे की ज्या महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये F.Y.B.Sc. (I.T.) या अभ्यासक्रमासाठी 45% (for Open Category) आणि 40 % (for Reserve Category) पेक्षा कमी क्षमतेच्या विद्यार्थ्यांना प्रवेशित केले आहे. अशा महाविद्यालयांनी त्या विद्यार्थ्यांचे अर्ज दिनांक 20 डिसेंबर 2023 पर्यंत प्रवेश, नावनोंदणी, पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जमा करावे. मुंबई विद्यापीठाने यंदा सकारात्मक निर्णय घेत जितके विद्यार्थी असतील त्यांस परीक्षेस बसण्यास परवानगी देण्याची अपेक्षा अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे.