राज्यातील शासकीय रुग्णालयांत पुरेसा औषधसाठा
हसन मुश्रीफ
नागपूर
नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील तसेच कळवा जि. ठाणे येथील शासकीय रुग्णालयात नुकत्याच घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिली.
नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय रुग्णालयांतील मृत्यूकरिता जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील घटना दुर्दैवी होत्या. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी सरकार घेईल. राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक महिन्यात अधिष्ठातांकडून रुग्णालयांची व उपलब्ध औषध साठ्याची माहिती घेऊ, कुठे औषधे कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. रुग्णालयांची पदभरती प्रक्रिया सुरू आहे. शासकीय रुग्णालयातील घटना प्रकरणी संचालनालयामार्फत केलेल्या चौकशीत आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्याची कार्यवाही चालू आहे.