राज्यात आवश्यक तेथे ट्रॉमा केअर सेंटर उभारणार
प्रा. डॉ. मंत्री तानाजी सावंत
नागपूर
अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित उच्च दर्जाचे उपचार आणि वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता राज्यात आवश्यक त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील 45 ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री.सावंत बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, मनीषा कायंदे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
यावेळी मंत्री श्री. सावंत म्हणाले की, राज्यातील 45 अकार्यान्वित ट्रॉमा केअर युनिट पैकी 17 चे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित 28 ट्रॉमा केअर युनिट कार्यान्वित करण्याची कार्यवाही वेगवेगळ्यास्तरावर सुरू आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या सतरा पैकी पंधरा ट्रॉमा केअर युनिटची पद निर्मिती झालेली आहे. यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाकडे सुरू आहे. या ट्रॉमा केअर युनिटसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तसेच गट ‘क’ व ‘ड’ पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवाराची परीक्षा घेण्याची प्रक्रिया टीसीएस या कंपनीमार्फत सुरू आहे.