सखी सावित्री समितीची स्थापना न करणाऱ्या शाळांवर कारवाई
मंत्री दीपक केसरकर
नागपूर,
राज्यात बहुतांश शाळांमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली आहे. अद्यापही ज्या शाळा सखी सावित्री समितीची स्थापना करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी सावित्री समितीची स्थापना करण्याबाबतचा प्रश्न सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य सतेज पाटील, प्रवीण दरेकर, श्रीमती मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला .
मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, प्राथमिक, शिक्षण संचालनालयाकडून शाळा, केंद्र, तालुका/ शहर स्तरावर सखी सावित्री समिती गठित करण्याबाबत 5 ऑक्टोबर 23 रोजीच्या पत्रान्वये निर्देश देण्यात आले आहेत. शाळा, केंद्र, तालुका / शहर स्तरावर सखी सावित्री समिती गठित करण्याची कार्यवाही सुरू आहे. परंतु अद्यापही ज्या शाळांनी सखी सावित्री समिती गठित केली नाही, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच तालुकास्तरीय सखी सावित्री समितीच्या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलविण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.